भाजपला गळती; हिंगणघाटमध्ये माजी नगरसेविकेसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश

>> चेतन वाघमारे, हिंगणघाट

लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच दणका बसला असून त्यातून भाजप सावरताना दिसत नाही. भाजपमधील अनेक नेते कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र आहे. अशातच हिंगणघाट शहरात भाजपला गळती लागली आहे. भाजपच्या माजी नगरसेविकेसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतली आहे.

नुकत्याच हिंगणघाट शहरात हरिओम सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजपच्या माजी नगरसेविका मंगलाताई कुमरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे.

भाजपसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष चंदूभाऊ तिजारे, शिवसेना सर्कल प्रमुख भारत रोकडे, भाजप अल्पसंख्याक हिंगणघाट शहर सचिव मो. शाकीर, सामाजिक कार्यकर्ता सुरज खोंडे, आदिवासी समाजाचे शहर अध्यक्ष मारोती राऊत यांचा यात सहभाग आहे. काल हरी ओम सभागृह येथे 500 च्या वर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. प्रवेशाचे नेतृत ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी उपसरपंच प्रवीण कलोडे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, अल्पसंख्यांक युवक रजत सचिव हुमायू मिर्झा उर्फ पाशु, हमदापुर सर्कलचे प्रवीण पाटील, बबलू शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात मंचावर जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह बबनरावजी हिंगणेकर वासुदेवराव गौळकार, युवती जिल्हाध्यक्ष माधवी पाटील, हिंगणघाट शहर अध्यक्ष बालूभाऊ वानखेडे, सिंधी शहर अध्यक्ष गंगाधररावजी कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे संतोषरावजी तीमांडे गुरुजी, तुषार हिंगणेकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठया संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.