शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बघण्याचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, असा विश्वास भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
भिवंडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भगवा सप्ताह कार्यक्रमात बाळ्यामामा म्हात्रे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या विजयात शिवसैनिकांचे मोठे योगदान असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राचा लौकिक देशभर होता. आता मात्र विकासाच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीच नाही तर महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा आहे आणि लवकरच ही इच्छा पूर्ण होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख विश्वास थळे, महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे, उपजिल्हा संघटक कविता भगत, उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, तालुका ग्रामीणप्रमुख कुंदन पाटील, युवासेना संघटक पंकज घरत, महिला संघटक फशीताई पाटील, इरफान भुरे, गोपाळ पाटील, महादेव घाटाळ, राजू चौधरी, अरुण पाटील, दीपक पाटील, दशरथ पाटील, प्रकाश तेलीवरे आदी उपस्थित होते.
शिवसैनिकांचा नेहमीच सन्मान
भिवंडी लोकसभेमधील शिवसेनेची ताकद माझ्या विजयातून दिसून आली आहे. भिवंडी ग्रामीण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांचे भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मताधिक्य 58 हजारांवरून 8 हजारांवर आले. मी महाविकास आघाडीचा खासदार असल्याने शिवसैनिकांचा नेहमीच सन्मान करणार असल्याचे प्रतिपादन बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले.