बाप्पाच्या आगमनात सिग्नल, न झालेली वृक्ष छाटणी, उंच-सखल रस्त्यांचा खोडा

गणेशोत्सवाला एक महिना बाकी असताना मोठय़ा गणेशोत्सव मंडळांचे गणपती मंडपांकडे न्यायला सुरुवात झाली असून आज परळ वर्कशॉपमधून ‘खेतवाडीचा मोरया’, ‘काळाचौकीचा महागणपती’, ‘अंधेरीचा विघ्नहर्ता’ आणि ‘परळचा मोरया’ आपापल्या मंडपांकडे ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत निघाले. मात्र त्यांच्या आगमनात नव्याने सुरू करण्यात आलेले कमानीच्या आकाराचे सिग्नल, काही ठिकाणी छाटणी न झालेली झाडे आणि कशाही प्रकारे बनवलेल्या उंच-सखल रस्त्यांमुळे बाप्पांना नेताना मंडळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी दमछाक झाली. दरम्यान, कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर बाप्पाचे पहिले दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज परळ वर्कशॉप आणि करी रोड येथील गणसंकुलात प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होताच, पण त्याचबरोबर वाहतूककोंडी टाळण्यासाठी बेस्टने या परिसरातून जाणाऱ्या मार्गांत बदल केले होते.

मुंबईसह देशभरात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला मोठय़ा भक्तिभावाने सुरुवात होणार आहे. मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह वेगळाच असतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात तर दोन-तीन महिने आधीच बाप्पाच्या स्वागतासाठी मंडप सजावटीसाठी लगबग सुरू असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाला फक्त महिना शिल्लक असून स्वागतासाठी गणेशोत्सव मंडळांचे मंडप सजले आहेत.

खेतवाडीचा गणपती अडीच तास खोळंबला

गिरगावच्या ‘खेतवाडीचा मोरया’ परळमधून गिरगावच्या दिशेने जाताना आयटीसी हॉटेलच्या सिग्नलमुळे हा गणपती अडीच तास खोळंबला. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य निखिल गावंड, अमित कोकाटे, गणेश गुप्ता, निखिल मौर्या, आशीष नरे, शुभम जाधव, ऋषिकेश व्हावळ यांनी भोईवाडा पोलीस ठाणे आणि बेस्टबरोबर समन्वय करून शेवटी हा सिग्नल हटवला, मात्र तोपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली होती.

सजावट, रोषणाईची कामे महिनाभर चालणार

मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. आज मोठय़ा गणेशमूर्ती मंडपात नेण्यात आल्या. या मूर्ती झाकून ठेवण्यात येणार आहेत. मंडळांकडून महिनाभर मंडप सजावट, विद्युत रोषणाई अशी कामे केली जाणार आहेत.

आज आगमन झालेल्या गणेशमूर्ती
परळ वर्कशॉप (मूर्तिकार सिद्धेश दिघोळे) – खेतवाडीचा मोरया, काळाचौकीचा महागणपती, कोल्हापूरचा चिंतामणीबकरी अड्डा (मूर्तिकार रेश्मा खातू) – वलसाडचा राजा
चिंचपोकळी (मूर्तिकार विपुल जाधव) – कुर्ल्याचा राजा