नाटय़गृहाच्या संवर्धनासाठी कोल्हापूरकर एकवटले, कृती समितीची स्थापना; एकमताने नऊ ठराव मंजूर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या आणि करवीरनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाच्या संवर्धनासाठी आज कृती समितीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कोल्हापूरकर एकत्र आले.

यावेळी या ऐतिहासिक नाटय़गृहाला लागलेल्या आगीची निवृत्त न्यायाधीश व दोन अशासकीय सदस्यांच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. वर्षभरात होती तशी पुनर्बांधणी करावी. यासाठी सरकारकडून जाहीर झालेला निधी तातडीने जिल्हा नियोजनकडे जमा करण्यात यावा तसेच या कामाची निविदा देशपातळीवर प्रसिद्ध करण्यात यावी, असे नऊ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या संदर्भात मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना याबाबत भेटण्याचेही एकमताने मंजूर करण्यात आले. राजर्षी शाहूंचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष असतानाही राज्य शासनाने काहीच कार्यक्रम न केल्याने, त्याचा यावेळी निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी रात्री नाटय़गृहाची पाहणी करून 20 कोटींचा निधी जाहीर केला. या पार्श्वभूमीवर खासबाग मैदानात पूर्वी जसे ओपन थिएटर होते, तसे निर्माण करावे, यांसह कामाच्या दर्जा तपासणीसाठी तज्ञांची समिती स्थापन केली जावी.

हेरिटेज इमारत असल्यामुळे मूळ ढाँचा न बदलता बांधकाम केले जावे. आगीची चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जावी, आदी सूचना विविध पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

निधी वेळेतच देणार – अजित पवार

गुरुवारी लागलेल्या आगीत अपरिमित हानी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाटय़गृहाची पाहणी करून पुनर्बांधणीसाठी 20 कोटींचा निधी जाहीर केला. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाटय़गृहाच्या नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादी पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी ते आज जिल्हा दौऱ्यावर आले होते.