विवाहाच्या दहा वर्षांनंतर एमपीएससीमध्ये यश; जिद्द, जिकाटीच्या बळावर पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान

लग्नानंतर आपले स्वप्न सोडून न देता ते जिद्द आणि चिकाटीने पूर्ण करणाऱया स्वाती अर्जुन या महिलेचे कौतुक होत आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब येथील स्वाती अर्जुन यांनी लग्नानंतर दहा वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान पटकावला. मुलांचा सांभाळ करत, संसाराचा गाडा हाकत त्यांनी ही कामगिरी केली आणि सासर-माहेरचे नाव चमकवले.

स्वाती अर्जुन यांचे पती गुंडुराम अर्जुन हे आर्मीत आहेत. पतीच्या प्रोत्साहनामुळे यश मिळवता आल्याचे स्वाती यांनी सांगितले. त्यांना रुत्विक (वर्षे 7) आणि रेहांश (साडेतीन वर्षे) अशी दोन मुले आहेत. मुलांकडे लक्ष ठेवण्याचे काम स्वाती यांच्या सासू-सासरे यांनी केले. त्यामुळे स्वाती यांना अभ्यास करता आला.

– 2017 साली सांगोल्यातील फार्मसी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. 2023 मध्ये त्यांनी एमपीएससीची मुख्य परीक्षा दिली. सरळ सेवा परीक्षेत यश मिळवले. सातारामधील एका शासकीय रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी म्हणून रुजू झाल्या. नोकरी करत असताना त्यांनी ग्राऊंडची तयारी सुरू ठेवली. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकारी व्हायचे ठरवले होते. ते स्वप्न आता पूर्णत्वास आलेय.