मूकबधिर तरुणाच्या हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट, ‘या’ कारणामुळे हत्या झाल्याचा संशय

दादरमधील सुटकेस हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मूकबधिर तरुणाची त्याच्याच मूकबधिर मित्रांनी हत्या केली होती. या हत्याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मूकबधिर समूहात मयत अर्शद अलीला मान मिळत होता. याच रागातून अर्शदचा काटा काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता जगपाल सिंग या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे. जगपाल सिंग हा आरोपी जय चावडा याचा जवळचा मित्र आहे.

जगपालच्याच सांगण्यावरुन जय आणि शिवजीतने अर्शदची हत्या केल्याचा संशय आहे. अर्शदची हत्या केल्यानंतर शिवजीतने जगपालला व्हिडिओ कॉल करुन काम झाल्याचे दाखवले. तसेच हत्येच्या वेळी बेल्जिअमच्या मोबाईल क्रमांकावरुन सात मिनिटांचा व्हिडिओ कॉल सुरु असल्याचेही समोर आले आहे. हत्येनंतर जगपालने हत्येचा लाईव्ह व्हिडिओ मूकबधिरांसाठी असलेल्या टीव्ही डफ व्हिडिओज ग्रुपवर शेअर केला. हा व्यक्ती दुबईतून सूत्र हलवत असल्याचा आरोप अर्शदच्या कुटुंबियांनी केला आहे.