इन्स्टाग्रामवर जडले प्रेम, लग्नासाठी पंजाबहून रत्नागिरी गाठली; पण एका फोनने प्रियकराची पोलखोल केली!

सोशल मीडियावरील प्रेम एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. प्रेमासाठी तरुणीने पंजाबहून रत्नागिरी गाठली खरी. पण रत्नागिरीत उतरताच आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या वेळीच लक्षात आले आणि पुढील अनर्थ टळला. मुलीने दुकानदाराला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर दुकानदाराने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीला सुखरुप तिच्या घरी पाठवले.

काय आहे प्रकरण?

वर्षभरापूर्वी पंजाबमधील 18 वर्षीय अंशू नामक तरुणीची रत्नागिरीतील हर्षकुमार यादव नामक तरुणाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. मग दोघांमध्ये चॅटिंग आणि व्हॉईस कॉल सुरु झाले. हळूहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. रत्नागिरीत आपल्या वडिलांचा बिझनेस असल्याचे हर्षने तरुणीला सांगितले. त्यानंतर एक दिवस हर्षने आपल्या लग्नाला घरच्यांची परवानगी मिळाल्याचे तरुणीला सांगितले.

लग्नासाठी तरुणीला रत्नागिरीत येण्यास सांगितले. प्रेमात आंधळी झालेली तरुणी पंजाबहून थेट रत्नागिरीत पोहचली. पंजाबहून रत्नागिरीत येण्यासाठी तरुणाने तिला प्रवास खर्चासाठी पैसेही पाठवले. तसेच तरुणाने प्रवासादरम्यान तरुणीला तिचे सीम कार्ड फेकून देण्यास सांगितले. रत्नागिरीला तिला घेण्यासाठी गाडी पाठवतो असेही सांगितले.

रत्नागिरीत पोहचल्यानंतर तिने हर्षला फोन लावला असता तो उचलत नव्हता. तरुणीने त्याला इन्स्टावर मेसेज, व्हॉईस कॉल केला मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर एक कॉल उचलला गेला. कॉल उचलत एका मुलीने हा हर्षकुमारचा नाही तर रिझानचा नंबर आहे असे सांगत पुन्हा या नंबरवर फोन न करण्याची ताकीद दिली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले.

घरी परतण्यासाठी तरुणीकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिने रत्नागिरीत नोकरी करुन पैसे मिळवू आणि घरी जाऊ असा विचार केला. यासाठी ती एका मोबाईलच्या दुकानात नोकरी मागण्यासाठी गेली आणि तिने दुकानदाराला आपबीती सांगितली. दुकानदाराने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीची चौकशी करत तिच्या पालकांशी संपर्क साधला. पोलिसांनी तरुणीला सुखरुप तिच्या घरी रवाना केले.