क्रिकेटपटूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरुच, मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून मोठी भेट

टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव झाला. बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या राज्यांकडूनही बक्षिस जाहीर करण्यात आले. या विजयाच्या महिनाभरानंतरही क्रिकेटपटूंवर बक्षिसांचा वर्षाव सुरुच असून क्रिकेटपटू मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारने एक मोठी भेट जाहीर केली आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला हैदराबाद येथे एक प्लॉट दिला जाणार आहे. हा प्लॉट 78, जुबली हिल्स येथे असून तब्बल 600 चौरस यार्डाचा आहे. मुख्यमंत्री रवंथ रेड्डी यांनी प्लॉट देणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आता त्यावर अंमलबजावणी होणार आहे.

केवळ सिराजला नाही तर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली नेमबाज इशा सिंग, बॉक्सर निखत झरिन यांनाही 600 चौरस यार्डाचे प्लॉट दिले जाणार आहेत. तेलंगणा सरकारकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. निखत आणि सिराज यांना सरकारने ग्रृप 1 च्या नोकरीचीही ऑफर दिली आहे.

बीसीसीआयने  हिंदुस्थानी संघाला दिले तब्बल 125 कोटी रुपयांचे बक्षीस

बीसीसीआयने दिलेली बक्षिसाची रक्कम संघातील 15 सदस्य, 4 राखीव खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये वाटली जाणार आहे. संघातील प्रमुख 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी, चार राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.