दिल्लीतल्या अहमदशहा अब्दालीने महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना सुपारी दिली आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच दिल्लीतले अहमदा शहा याची मजा बघतात अशी टीकाही राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दाली शहाचे लोक होते. अहमद शहा अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी सुपारी दिल्या आहेत, त्यातली एक सुपारी होती. pic.twitter.com/UIFQrkRfr5
— Saamana (@SaamanaOnline) August 11, 2024
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राऊत म्हणाले की, ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात जागोजागी स्वागत झालं. सभागृह भरगच्च भरलं होतं. माननीय उद्धव ठाकरेंनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं.
राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दाली शहाचे लोक होते. अहमदशहा अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी सुपारी दिल्या आहेत, त्यातली एक सुपारी होती. मी कालही स्पष्ट केलं, बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला. त्यांच्या गाडीवर काहीतरी फेकलं ते आम्ही वृत्तपत्रात वाचलं, त्याच्याशी शिवसेने पक्षाशी संबंध नाही. अनेक पक्षातले मराठा आंदोलक एकत्र आले आणि त्यांनी राग व्यक्त केला असेल, त्याच्याशी शिवसेना म्हणून त्यांचा संबंध नाही. जे म्हणत आहेत अॅक्शनला रिअॅक्शन त्यांना मला सांगायचंय की काळोखाचा फायदा घेऊन काही फेकलं असेल म्हणून तुम्ही वाचलात. जर तुम्ही मर्दांची औलाद असता तर समोर येऊन केलं असतं. माझी त्यांना शिवसेना पक्षातर्फे हात जोडून विनंती आहे, पुन्हा अशी कृत्य काळोखात, अंधारात, लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका. तुमच्या घरी तुमचे आई वडिल, मुलं आणि पत्नी वाट पाहतात. अहमदशहा अब्दाली सुपाऱ्या देऊन दिल्लीत मजा बघतोय. महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी अहमदशहा अब्दालीने राज्यातील तीन नेत्यांना सुपारी दिली आहे. आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात हे आपण पाहिलं असेही राऊत म्हणाले.
मी कोणत्याही पक्षाचे नाव घेत नाही, कारण महाराष्ट्राचा शत्रू अहमदशहा अब्दाली याच्या इशाऱ्यावरून आणि सुपारीवरून सुरू आहे. ही बाब राज्याचे मिंधे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. अॅक्शनला रिअॅक्शन काय म्हणता, दोन ते तीन महिन्यात तुम्हाला कळेल अॅक्शनला रिअॅक्शन काय असते असा इशाराही राऊत यांनी दिला.
नशीब त्यांचं की ते समोर आले नाहीत. जर समोर असते तर शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे दिसलं असतं. मराठी माणसात भाडणं लावायचं काम दिल्लीचा अहमदशहा अब्दाली करतोय. त्याला काही मराठी माणसं बळी पडली असून त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिली आहे असा आरोपही त्यांनी केला.
सेबीच्या प्रमुख बुच यांचे अदानी कंपनीत भागीदारी असल्याचे हिंडेनबर्गने म्हटले आहे. देशातल्या वित्तीय संस्था आणि त्यावर देखरेख करणाऱ्या संस्था कशाप्रकारे काम करतात भ्रष्ट होत आहेत हे समोर येत आहे. असे असले तरी जर सरकार गप्प बसत असेल तर हे सरकार सर्वात मोठे भ्रष्ट आहे असेही राऊत म्हणले. तसेच निवडणूक रोखे घोटाळ्यानंतर हा हिंडेनबर्ग घोटाळा. सेबीच्या प्रमुख बुच यांचे काम आहे वित्तीय संसंथेवर देखरेख ठेवणे. त्या प्रमुखच पंतप्रधानच्या लाडक्या उद्योगपतींशी हात मिळवणी करतात. त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करणार? असेही राऊत यांनी सांगितले.