काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

नटवर सिंह यांनी हे यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात मे 2004 ते डिसेंबर 2005 या काळात परराष्ट्र मंत्री होते. ते मूळचे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. अजमेरच्या मेयो कॉलेज आणि ग्वालियरच्या सिंधिंया स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसमध्ये शोककळा पसरली असून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला.

काँग्रेस नेते आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही नटवर सिंह यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का पचवण्याची ताकद दे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट सुजरेवाला यांनी केले आहे.

नटवर सिंह यांच्या वडिलांचे नाव गोविंद सिंह तर आईचे नाव प्रयाग कौर होते. सिंह यांचा जन्म भरतपूर संस्थानात झाला. त्यांनी अजमेरच्या मेयो कॉलेज आणि ग्वालियरच्या सिंधिया स्कूलमध्ये शिक्षण घेतले. हिंदुस्थानी राजघराण्यातील मुलांना शिक्षण देणारी ही पारंपरिक संस्था आहे. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर केब्रिज विश्वविद्यालयाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्येही शिक्षण घेतले. तसेच काही काळ ते चीनच्या पेकिंग विश्वविद्यालयात स्कॉलर म्हणूनही राहिले. ऑगस्ट 1967 मध्ये त्यांचा विवाह महाराजकुमारी हेमिंद कौर यांच्याशी झाला. पटियाळा राज्याचे अखेरचे महाराज यादविंद्र सिंह यांची ती मोठी मुलगी होती.

नटवरवर सिंह हे 1953 मध्ये परराष्ट्र सेवेत रुजू झाले. 31 वर्ष त्यांनी येथे सेवा केली. सुरुवातीला त्यांची नियुक्ती चीनमध्ये झाली होती. त्यानंतर अमेरिका आणि यूनिसेफच्या कार्यकारी बोर्डामध्ये त्यांनी हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून काम केले. 1963 ते 1966 दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या समितीतही ते होते. 1966 मध्ये त्यांची नियुक्ती पंतप्रधान सचिवालयात झाली. यासह 1971 ते 1973 मध्ये त्यांनी पोलंडमध्ये राजदूत म्हणून कार्य केले. 1973 ते 1977 पर्यंत ते यूकेमध्ये हिंदुस्थानचे उप उच्चायुक्त होते, तर 1980 ते 1982 पर्यंत त्यांनी पाकिस्तानमध्ये राजदूत म्हणून काम केले. 1982 ते 1984 या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून काम केले. 1984 मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.