बच्चू कडूंचा महायुतीला 1 सप्टेंबरचा अल्टिमेटम, पुण्यात शरद पवार यांची घेतली भेट

‘अपंग, शेतकरी, मजूर यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी मी काहीही निर्णय घेऊ शकतो. या मुद्द्यांवरूनच कोणाबरोबर जायचे, याचा निर्णय होईल. महायुतीने आमचे 17 मुद्दे मान्य केले नाहीत तर आम्हाला पर्याय आहेत,’ असा इशारा देऊन बच्चू कडू यांनी महायुती सरकारला 1 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, ‘सध्या फक्त आरोप-प्रत्यारोपांचं, जातीपातीचं आणि आरक्षणाचं राजकारण सुरू आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांचे प्रश्न अजेंड्यांवर यावेत, असे माझे प्रयत्न आहेत. या प्रश्नांवरून लोकचळवळ व्हावी, यासाठी मी विविध नेत्यांना भेटत आहे. आमचे एकूण 17 मुद्दे असून, मी पवारसाहेबांशी आज त्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

संजय काकडे यांनीही घेतली भेट

भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनीदेखील शनिवारी शरद पवार यांची भेट घेतल्याने भाजपच्या गोटामध्ये खळबळ उडाली. काकडे हे महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये पुण्यातून ते इच्छुक होते. मात्र, भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून काकडे यांच्या राजकीय भूमिकांबद्दल चर्चा होत आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनीही पवार यांच्या भेटीनंतर खुलासा केला. ही राजकीय भेट नसल्याचा दावा करताना, माझ्या मित्राच्या वैयक्तिक कामासाठी मी पवार यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले.