आरेतील निकृष्ट काँक्रीटचा रस्ता खोदून नव्याने बांधा, बेजबाबदार कंत्राटदाराला पालिकेचा दणका; निकृष्ट काम केल्यास काळ्या यादीत टाकणार

आरे वसाहतीमधील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदाराला पालिकेने चांगलाच दणका दिला असून रस्ता खोदून नव्याने स्वखर्चाने बांधण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय पुन्हा निकृष्ट काम केल्यास दुप्पट दंड आणि तिसऱयांदा निकृष्ट काम केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय रस्ते कामावर देखरेख ठेवणाऱ्या गुणवत्ता देखरेख संस्थेकडूनही नव्याने रस्ता बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या रकमेइतका दंड वसूल करण्यात येणार आहे. शिवाय संबंधित अभियंत्यांनाही पालिका प्रशासनाकडून सक्त लेखी ताकीदही देण्यात आली आहे.

आरे वसाहतीत केलेले काम अत्यंत निकृष्ट केल्याचे समोर आले आहे.  या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केली. यावेळी काम निकृष्ट केल्याचे समोर आले. यानुसार पालिका प्रशासनाकडून बेजाबदार कंत्राटदाराला दंड आकारण्यात आला आहे. आरे वसाहत मुख्य रस्ता (दिनकरराव देसाई मार्ग) अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गापासून मोरारजी नगरपर्यंत सिमेंट-काँक्रीटीकरण व इतर ठिकाणांची बांगर यांनी पाहणी केली होती. यावेळी सिमेंट- काँक्रीटीकरण रस्त्यांना काही ठिकाणी भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय काही ठिकाणी तडे गेल्याचे तर काही ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभागा जीर्ण झाल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित कंत्राटदार, गुणवत्ता देखरेख संस्था आणि संबंधित अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ‘आरे’तील सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख संदीप गाढवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत रस्ता दुरुस्ती करावी आणि बेजबाबदार कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.

अशी होणार कारवाई

कंत्राटदाराने तडे गेलेले, पोत न राखलेले आणि काँक्रीट पृष्ठभागावर जीर्ण दोष आढळलेले भाग तातडीने काढावेत. बाधित भाग नव्याने तयार करावेत, या कामात या कार्यवाहीमध्ये नजीकच्या सिमेंट पॅनलचीही दुरुस्ती करावी, असे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. प्रारंभिक त्रुटींमुळे झालेल्या खर्चाच्या रकमेचा तसेच त्याच्या समतुल्य दंडाची कपात कंत्राटदाराच्या देयकामधून करण्यात येईल. कमी गुणवत्तेची कामे कदापि खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही कंत्राटदाराला देण्यात आला आहे.