समृद्धी महामार्गावर अतिवेगाचे बळी, आतापर्यंत तब्बल 17 हजारांहून अधिक अपघात; 215 जणांचा मृत्यू

मुंबईतून कमी वेळेत नागपूरला पोहोचवण्यासाठी तयार झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आतापर्यंत तब्बल 17 हजार 255 अपघात झाले आहेत. सुसाट वेग आणि वाहन चालवताना ड्रायव्हरला लागलेली डुलकी यामुळे झालेल्या अपघातात 215 जणांना जीव गमवावा लागला आहे.

नागपूर ते मुंबई या 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर ताशी 150 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने महामार्ग बांधण्यात आला आहे, पण सध्या या महामार्गावर ताशी 120 किमीची मर्यादा आहे. या महामार्गावरून आतापर्यंत 1 कोटी 18 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे, पण समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांच्या मालिकांमुळे अजून प्रवासी या महामार्गावरून प्रवास करण्यास घाबरत आहेत.

सरळसोट रस्ता असल्यामुळे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. अतिवेगामुळे अनेकदा ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपाययोजण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अपघातांची कारणेही शोधली. त्यामध्ये ड्रायव्हरला लागलेली डुलकी, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक सामान भरलेली वाहने (ओव्हरलोड), ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, ताण, रोडहिप्नॉसीस (संमोहनावस्था) आणि वाहनचालकाचे झालेले दुर्लक्ष ही प्रमुख कारणे आहेत. पण अपघात कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विविध उपाय योजले आहेत.

आतापर्यंतचे अपघात

– वाहनांचे अपघात – 2,657
– जनावरांची धडक – 2,176
– वाहनांना आग – 121
– वाहनांमध्ये बिघाड – 12,232
– इतर – 69

– आतापर्यंत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या – 215
– अपघातात गंभीर जखमी झालेले प्रवासी – 1,251
– किरकोळ जखमी झालेले प्रवासी – 1,871

जनावरांची धडक

हा महामार्ग जंगलातून जातो. त्यामुळे जंगलातील जनावरे अचानकपणे महामार्गावर येतात. त्यातूनही अपघात होतात. जनावरांनी वाहनांना धडक देण्याच्या 2 हजार 176 घटना घडल्या आहेत. त्यात 2 हजार 385 जनावरांचा मृत्यू झाला तर 65 जनावरे जखमी झाली.