
महागडे वाहन खरेदी केल्यानंतर गाडीला आवडता नंबर मिळावा यासाठी अनेक जण उत्सुक असतात. मनासारखा नंबर मिळावा यासाठी हौसी ग्राहक हवे तितके पैसे मोजायची तयारी ठेवतात. आता याचाच फायदा पेंद्र सरकारने घ्यायचे ठरवले आहे. वाहनांच्या फॅन्सी नंबरवर केंद्र सरकार 28 टक्के जीएसटी लावण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारने यासंबंधी एक योजना बनवली असून वाहनाचा फॅन्सी नंबर मिळवणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागतील. या संबंधीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. यात असे विचारण्यात आले आहे की, फॅन्सी नंबर किंवा नंबर ऑफ चॉइस लक्झरी वस्तू मानून यावर जास्त जीएसटी लावली जाऊ शकते. फिल्ड फॉर्मेशन्सने सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेज अॅण्ड कस्टम्स (सीबीआयसी)ला पत्र पाठवून यासंबंधी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. फिल्ड फॉर्मेशन्सच्या म्हणण्यानुसार, फॅन्सी नंबर प्लेट्स लक्झरी वस्तू आहे. यावर 28 टक्के जीएसटी लावायला हवी.
लाखो रुपयांना फॅन्सी नंबरचा लिलाव
गाड्यांच्या नंबर प्लेट किंवा रजिस्ट्रेशन प्लेट देण्याचे काम राज्य सरकारचे आहे. फॅन्सी नंबर देण्यासाठी राज्य सरकारकडून लिलाव केला जातो. यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. फॅन्सी नंबरसाठी आयोजित केलेल्या लिलावात लाखो रुपये मोजले जाते.
काय आहे फिल्ड फॉर्मेशन्स
फिल्ड फॉर्मेशन्स सर्व राज्यांत केंद्र सरकारचे कार्यालय असते. ते टॅक्स कलेक्शनसाठी जबाबदार असतात. टॅक्स कलेक्शन शिवाय, फिल्ड फॉर्मेशन्स टॅक्स नियमांना लागू करण्याची जबाबदारी करतात.