लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख प्रथमच ठाण्यात आलेले आहेत. घाटकोपरपासून ते मुलुंड चेकनाकापर्यंत रस्त्याच्याकडेनेउद्धवसाहेबांसाठी लोक दोन्ही बाजूला उभे होते. याचं कारण एकच आहे… ठाणे हे शिवसेनेचचं आहे, चोरलेल्या शिवसेनेचं नाही, चोरांचं नाही… जी शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली. आणि ज्या हिंदुहृदयसम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला, त्या शिवसेनेचं हे ठाणं आहे. त्या ठाण्याने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर तोफ डागली.
हा भगवा सप्ताह आहे. राज्यभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पण ठाण्यात हा भगवा सप्ताह काल व्हायला हवा होता. काल नागपंचमी होती. म्हणजे ज्या सापांना आपण इतकी वर्षे दूध पाजलं या ठाण्यात अगदी हिंदुहृदयसम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धवसाहेब आपणही वर्षानुवर्षे आपण ठाण्यातल्या ज्या सापांना दूध पाजलंत त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या, विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमचा भगवा सप्ताह आहेच. कारण शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे. त्यांचं काय? तर आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींकडे… आम्हाला जगवासाहेब… आम्हाला जगवा… म्हणतात. त्यांचा भगवा असूच शकत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढताहेत. हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत. मलाही सिनेमा काढायचा आहे. मी बाळासाहेबांवर सिनेमा काढला आहे. त्यात सत्य सांगितलं आहे. पण मला एक सिनेमा काढायचा आहे, नमक हराम 2. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. एक नमक हराम चित्रपट आला होता, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांचा. नमक हराम टू चं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे. मी चांगला लेखक, संपादक, पत्रकार आहे. राजकारण माझ्यासमोर घडतं किंवा आम्ही घडवतो. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहायाला पाहिजे आणि बिघडवत पण राहायाल पाहिजे. तेव्हा लवकरच नमक हराम 2 हा सिनेमा काढणार आहे. आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे, असा वज्राघात संजय राऊत यांनी केला.
जसं गब्बर म्हणतो ना… पूरा नाम मिट्टी में मिला दिया… तसं ठाण्याचं नाव या गद्दारांनी आणि इथल्या गब्बरांनी पूर्ण मातीत मिळवलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ठाणे कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी, नमक हरामांनी संपूर्ण देशात ठाण्याचं नाव बदनाम केलं आहे. काय-काय रोज घोषणा करताहेत जिंकण्यासाठी, माणूस धडपड करतो जगण्यासाठी. पैसा आहे म्हणून एकदा जिंकलात लोकसभेला. हे मिंधे जे आहेत हे लबाडी केल्याशिवाय जिंकूच शकत नाही, यांच्या रक्तातच लबाडी आहे. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी लबाडी केली. ठाण्यात तर केलीच. आणि ती लबाडी कशी केली हे राजन विचारे यांनी सांगितलं. त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
लाडकी बहीण, लाडकी खुर्ची… मोदींचे लाडके गद्दार… ठाण्यात किती लाडक्या बहिणींचे संसार, पोटापाण्याचे रोजगार यांनी उद्ध्वस्त केले ते आधी सांगा? जे निष्ठेने उद्धवसाहेबांबरोबर, शिवसेनेबरोबर राहिले त्यांच्या घरांवर, त्यांच्या लहान व्यावसायांवर बुलडोझर फिरवले. या लाडक्या बहिणी नाहीत का? लाडक्या बहिणीची किंमत फक्त दीड हजार? आमदारांना 50 कोटी आणि लडक्या बहिणींना दीड हजार. मतदारांना विकत घेण्यासाठी प्रत्येक मतदाराला 10 हजार आणि लाडकी बहीण पंधराशे. आणि जी लाडकी बहीण निष्ठेने राहील आपल्या खऱ्या शिवसेनेबरोबर तिच्या घरावर तिच्या उद्योगावर बुलडोझर… हा गुजरात पॅटर्न आहे. हा महाराष्ट्रात चालणार नाही. हे सगळं लुटून न्यायचं आणि या मिंध्यांनी लाचारीने गप्प बसायचं. माननीय उद्धवसाहेब तीन दिवस दिल्लीत होते. अभिमान वाटावा महाराष्ट्राला, असा त्यांचा दिल्लीचा दौरा झाला. देशाच्या राजधानीत उद्धवजींचं आगमन झालं तेव्हा अहमदशाह अब्दाली हा घाबरून त्याच्या घरातच बसला होता. मात्र उद्धवसाहेबांसाठी दिल्लीच्या जनतेनं, दिल्लीच्या राजकारण्यांनी त्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलं होतं. सकाळी कोणतरी म्हणत होते, कशाला गेले दिल्लीत? तुमची कबर खणायला आम्ही दिल्लीत गेलो होतो, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली. तुम्हाला गाडायला आम्ही दिल्लीत गेलो होतो. आणि तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. हे जातात दिल्लीत, त्यांना भेट तरी मिळते का? मोदींच्या गवतावर बसतात, पांढऱ्या पँटवर गवत लावून परत येतात. आम्हाला माहितीये दिल्ली काय आहे, तुम्ही आम्हाला दिल्ली शिकवू नका? शिवसेनाप्रमुखांच्या कृपेने आमचं अख्ख आयुष्य दिल्लीत गेलं आहे. तुमच्या पोराबाळांना लायकी नसताना दिल्लीत पाठवण्याचं काम उद्धवसाहेबांनीच केलं आहे. दिल्ली ही देशाची राजधानी होती कालपर्यंत, आता ती गुजरातची राजधानी झाली आहे आणि ते आम्हाला नष्ट करायचं आहे. दिल्ली देशाची राजधानी झाली पाहिजे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
उद्धवसाहेब का गेले दिल्लीला? जेव्हा-जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा-तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेला आहे. देशावर संकट आहे आणि ते संकट हुकूमशाहीचं आहे. म्हणून माननीय उद्धवजी दिल्लीत जातात आणि दिल्लीत राजकारण करतात. कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा… म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरेसाहेबांना घ्यावी लागेल, दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल आणि विरोधकांना गाडावं लागेल, असे संजय राऊत पुढे म्हणाले.
कोण हे मोदी? विश्वगुरू… ती आमची विनेश फोगाट हीचं रौप्यपदक काढून घेतलं तेव्हा अजूनही यांच्या विश्वगुरुंचा आवाज आलेला नाही. पॅरिसच्या ऑलिम्पिकच्या 117 खेळाडूंचं पथक गेलेलं आहे. त्यात हरयाणा, अरुणाचल, महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. त्यात महाराष्ट्राला पदक मिळालेलं. पण गुजरातचे फक्त दोनच खेळाडू आहेत. पण स्पोर्ट्सचा जो फंड आहे, खेळावर जो खर्च होतो, तो सर्वाधिक 469 कोटी हा गुजरातला दिलेला आहे, फक्त दोन खेळाडूंसाठी. हा गुजरात पॅटर्न आहे. खेळात आणि सैन्यात कधीच गुजरात नाही, त्यात महाराष्ट्रच आहे. देशाचं संरक्षण करणं देशासाठी हौतात्म्य पत्करणं, देशासाठी बलिदान करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे आणि आम्ही तो करणार. आमच्यावर तुम्ही असे कोणी तोतये सोडणार असाल, तर ते तोतये आम्ही त्याच भूमित गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावले. महाराष्ट्रात घटनाबाह्य तोतयांचं सरकार सुरू आहे. इतिहासात असे तोतये खूप झाले होते. त्यांची पाळेमुळेही ठाण्यातच आहेत. इतिहासात तोतयाचं बंड झालं होतं. पानिपतात सदाशिवराव भाऊ मोठे योद्धे होते. लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली. अहमदशाह अब्दाली तिथे होता. सदाशिवभाऊंचा स्वर्गवास झाला आणि त्यानंतर एक बनावट पुण्यामध्ये अवतरला. आणि मीच वारसदार आहे या पेशव्यांचा आणि मराठा राज्याचा. तेव्हा खूप मोठी चौकशी झाली, शोध घेण्यात आला. तेव्हा कळलं की तो बनावट होता आणि महाराष्ट्राचं राज्य गिळंकृत करायला आला होता. आणि त्या बनावट सदाशिवभाऊचं नाव होतं सुखलाल. ठाण्यातही इथे सुखलाल आहेतच एक. तो सुखलाल होता, त्याच्याबरोबर जे दहा लोक होते, त्यात एक शिंदे होता. गंगूजी शिंदे होता. त्याचं जे नेटवर्क होतं ते ठाणे, पालघर भागात होतं. हा योगायोग आहे की मला माहिती नाही. हा सुखलाल जो होता तो गुजरातच्या सुरतचा होता. अशा प्रकारे बनावट लोक तयार करून महाराष्ट्राचं राज्य ताब्यात घ्यायचं, मराठी माणसाचं राज्य ताब्यात घ्यायचं ही कट कारस्थानं इतिहास काळापासून सुरू आहेत. आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राने ही कट कारस्थानं उधळून लावली आहेत. भगव्या सप्ताह निमित्ताने आपण एक विचार केला पाहिजे. आपण भगव्याचे खरे रक्षणकर्ते आहोत, आपण तोतये नाहीत. त्यामुळे या तोतयांसमोर आपल्याला घाबरण्याचं आणि झुकण्याचं अजिबात कारण नाही. आपण खरे आहोत, दुनिया सत्याचीच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण जिंकणार आहोत हा आत्मविश्वास घेऊन आपण सामोरं जायला पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
महाराष्ट्रात जे बसले आहेत त्यांना शेख हसीना प्रमाणे पळवून लावावं, अशी जनतेची इच्छा आहे. तसं यांना महाराष्ट्राची जनता शेख हसीनाप्रमाणे पळवून लावणार आहे. ते पुढे जनता मागे… ते पुढे जनता मागे… कोणी त्याचे कपडे फाडतंय… कोणी काय करतंय… कोणी कुठे हात घालतंय… पण आम्ही त्यांच्या इतके क्रूर नाहीत. आम्ही त्यांचा निवडणुकीत पराभव करू. आम्ही महाविकास आघाडी म्हणून 180 जागा जिंकू. जास्तही जिंकू, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व महाराष्ट्राला हवं आहे. तुमचा फेस कोण? असं लोक विचारतात. ज्यानं गेल्या पाच वर्षांत दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे. बाकी सगळे मुखवटे लावून फिरताहेत. मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा. मनात आणि मनगटात आत्मविश्वास घेऊन आपण पुढल्या दोन महिन्यांत काम केलं पाहिजे, हे भगव्या सप्ताहाचं महत्त्वं आहे. लोकांच्या मनात शिवसेना आहे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ऋण विसरण्याइतका अद्याप महाराष्ट्र नमक हराम झालेला नाही. मोदी आणि शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी या महाराष्ट्रावर शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ऋण त्यांना पुसता येणार नाही. लोकांच्या मनातून बाळासाहेब ठाकरे त्यांना असे संपवता येणार नाहीत. तुम्ही कितीही मिंधे निर्माण करा, असे मिंधे येतील आणि जातील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. औरंगजेब गुजरातला जन्माला आला. आम्हाला त्याचा आदर्श नाही, आम्हाला आमच्या शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आहे. आणि आजच्या भगव्या सप्ताहाचं आपलं तेच ध्येय आणि तोच उद्देश आहे. पुढल्या दोन महिन्यातील लढाई ही अत्यंत महत्त्वाची आहे. निर्णायक आहे. ही लढाई जिंकल्यावर पुढची 25 वर्षे महाराष्ट्रावर आपलं राज्य राहील आणि आपलाच चेहरा राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.