गुलदस्ता – आनंददायी योग

<<< अनिल हर्डीकर

पंडित अरविंद गजेंद्रगडकर आणि सुप्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्या पहिल्या अकस्मात झालेल्या भेटीची उकल दुसऱ्या भेटीत झाली. दोन दिग्गजांच्या सुरेल वाटचालीतील हा आनंददायी योग श्रोत्यांनाही मुग्ध करणारा आहे. नव्या पिढीच्या संगीतरसिकांना कदाचित पंडित अरविंद गजेंद्रगडकर हे नाव अपरिचित असेल. ते एक सुप्रसिद्ध बासरीवादक तसेच संगीत दिग्दर्शक आणि `वेणुवंदना’ या संस्थेचे संस्थापकसुद्धा होते, ज्या `वेणुवंदना’ने विजय किचलू, विवेक बिवलकर, केदार आणि कौशिकी पावर्ती असे शिष्य रसिकांना दिले. स्वरमंडल वादनाचे एकल कार्पाम करणारे ते एकमेव कलाकार होते. भीमसेन जोशी यांच्या `संतवाणी’ या कार्पामात ते महत्त्वाची भूमिका बजावत. महाराष्ट्राच्या मातीत ज्या संतांची शिकवण रुजली, त्या संतांविषयी विस्तृत माहिती अरविंदजी आपल्या रसाळ निवेदनात करून देत.

अरविंदजींनी जितेंद्र अभिषेकी, उषा मंगेशकर, कृष्णा हंगल, रवींद्र साठे, पद्मजा फेणाणी अशा मोठ्या गायकांच्या गाण्यांचे संगीत नियोजन केले आहे. त्याहीपेक्षा अरविंद गजेंद्रगडकर यांचा एक वेगळा पैलू म्हणजे त्यांचे संगीतविषयक लेखन. शास्त्रीय संगीतावर अत्यंत माहितीपूर्ण पंचवीसहून अधिक पुस्तके त्यांच्या खात्यावर जमा आहेत. असे हे गुणी कलाकार धारवाड आणि पाटणा केंद्रावर काम करून पुण्याच्या आकाशवाणीत प्रोड्युसर म्हणून रुजू झाले होते. साल होतं 1966!

1962 पासून मुंबई आकाशवाणी केंद्रावर नव्याने आलेल्या हरिप्रसाद चौरसिया या बासरी वादकाचं नाव गाजायला सुरुवात झाली होती. `तो आला, त्याने वाजवलं आणि त्याने जिंकलं!’ अशीच त्याच्याबद्दलची कीर्ती होती. 1962 ला त्यांच्या मनाविरुद्ध बदली होऊन ते ओरिसाच्या कटक केंद्रावरून मुंबई केंद्रावर आले. आल्या आल्या त्यांची कीर्ती इतकी पसरली की, प्रत्येक संगीत संमेलनात त्यांचे नाव गाजू लागले. ते मदन मोहनसारख्या प्रतिभावान संगीतकारांच्या गळ्यातला ताईत झाले, लतादीदींचे लाडके झाले. त्यांनी 1964 मध्ये आकाशवाणी सोडली आणि पूर्णवेळ बासरी वादन करू लागले.

1968 सालची गोष्ट. आकाशवाणी पुणे केंद्रावरच्या एका संगीत सभेसाठी अरविंदजींनी हरिप्रसाद चौरसियांना बोलवायचे ठरवले. त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले. कार्पाम संध्याकाळी होता. हरिप्रसाद सकाळच्या गाडीने आले. ज्या बासरी वादकाबद्दल एवढे भरभरून ऐकले होते त्या हरिप्रसादला भेटायला अरविंदजी आतुर झाले होते. तेच त्याला घ्यायला रेडिओची गाडी घेऊन गेले. त्यांची उतरण्याची व्यवस्था कॅम्पमधल्या एका बऱ्यापैकी हॉटेलात केली होती. चहापाणी झाल्यावर खास बनारसी पानाचा विडा अरविंदजींना देत आणि स्वत खात त्यांनी अरविंदजींना विचारलं,”अरविंदजी, तुम्ही काही वर्षांपूर्वी बनारसला संगीताचे प्रोफेसर होता ना?”
“हो, होतो. का बरं?”
“त्या वेळी तुम्ही अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावरून बासरीचे कार्पाम करायचा. हो ना?”
“हो, करायचो.”
“त्या वेळी एका मुलाने तुम्हाला एकदा विचारलं होतं, बासरीची ऑडिशन कशी द्यावी? आठवतं का?”
“हो हो, आत्ता आठवलं. त्याला मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. तो पुढे भेटला नाही, त्याचं काय झालं कुणास ठाऊक!”
“मी सांगतो, मला माहित्ये. तो ऑडिशन पास झाला. पुढे कटक केंद्रावर आकाशवाणी कलाकार म्हणून लागला. मुंबई केंद्रावर बदलून आला आणि आज तो तुमच्यापुढे उभा आहे.” हरीजी हसत म्हणाले.

अरविंदजींना हरिप्रसादजींशी झालेली जी पहिली भेट वाटत होती ती प्रत्यक्षात दुसरी होती. पहिली भेट हरिप्रसादजींना आठवत होती. कारण पहिल्या भेटीवेळी अरविंदजी प्राध्यापक म्हणून नाव असलेले होते आणि हरिप्रसाद साधाभोळा इंटरपर्यंत शिक्षण झालेला, डोळ्यांत अनेक रंगीत आणि सुरेल स्वप्नांची जपणूक करणारा उमदा, अठरा- एकोणीस वर्षांचा कोवळा तरूण!

अरविंदजी बनारसला संगीत कॉलेजात संगीताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते तसेच रेडिओ आर्टिस्ट होते. मुंबईच्या आकाशवाणीवर कार्पाम प्रसारित करत असत. बनारसला त्या वेळी आकाशवाणी केंद्र नव्हतं. एकदा अलाहाबाद केंद्रावरून कार्पाम संपवून अरविंदजी बाहेर आले तेव्हा एक तरुण अरविंदजींना भेटायला आला होता. तोच हा…हरिप्रसाद… हरिप्रसाद चौरसिया!

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आईच्या मायेचं छत्र हरपलेल्या हरिप्रसादजींनी कुस्तीपटू व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. नाईलाजाने हरीजी आखाड्यात जात, पण वडिलांच्या अपरोक्ष ते संगीताचे शिक्षण आणि रियाज त्यांच्या मित्राच्या घरी करत. मात्र त्या वेळी केलेल्या शारीरिक कसरतीमुळे ते आजही बासरी वाजवतात.
सुरुवातीला वाराणसीच्या भोलानाथ प्रसन्न यांच्याकडे आठ वर्षे ते बासरीवादन शिकले. अनेक वर्षांनंतर बाबा अल्लाउद्दीन खान यांची कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडे त्यांची अट मान्य करून शिकले. त्यांची अट होती की, एरवी उजव्या हाताने बासरी वाजवणारे हरीजी यांनी डाव्या हाताने बासरी वाजवावी. आजही हरीजी डाव्या हाताने बासरीवादन करतात.

शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त सुप्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्मा यांच्यासोबत `सिलसिला’, `चांदनी’ अशा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. एवढेच नव्हे तर, मुंबईत आणि भुवनेश्वरला वृंदावन गुरुकुलची स्थापना केली. तसेच अनेक नामवंत पाश्चात्त्य संगीतकारांसमवेत त्यांनी हिंदुस्थानी चित्रपटांसाठी काम केलं. अनेक मानाचे पुरस्कार मिळवलेले हरीजी आजही आपल्या सुरेल बासरी वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत आहेत.

[email protected]