जोपर्यंत ईडीची छडी गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात आहे तोपर्यंत आपल्या पक्षात कोणी येणार नाही. जे संकटात आहेत, ज्यांच्यावर केसेस आहेत ते आपल्याकडे येणारच नाही. आपल्याकडे येण्यासाठी मर्दाचे काळीज लागते. ज्यावेळी मोदी, शहा बाजूला जातील त्यावेळी खासदार कोल्हे यांनाच पक्षप्रवेशासाठी फोन येतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शिवस्वराज्य यात्रा आंबेगाव तालुक्यात आल्यानंतर मंचर येथे झालेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार डॉ.अमोल कोल्हे, रोहिणी खडसे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष देवदत्त निकम, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, “2024 च्या विधानसभेत नवे चेहरे दिसणार असून फसवेगिरी करणाऱ्यांचा सुपडा साफ होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची वाट पाहतोय. महाविकास आघाडीची बेरीज 175 च्या पुढे जाईल. जर महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून 100 च्या आत आले नाही, तर माझे नाव बदला.” असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, “तसेच माझ्या लाडक्या भगिनींनो चिंता करू नका. सध्या सरकार जे देते ते घ्या आमचे सरकार सत्तेवर येईल त्यावेळी यापेक्षा चांगली सेवा लाडक्या बहिणीला देऊ. लाडका बहीण, लाडका भाऊ यानंतर आता लाडका जावई अशी योजना येणार आहेत.” हे सर्व लाडक्या खुर्चीसाठी सुरू असल्याचा टोला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला.
जयंत पाटील यांच्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधत जोरदार फटकेबाजी केली. सध्याचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार नाही. महाराष्ट्रातील जनतेने फोडाफोडीचे राजकारण पाहिले असून जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे, असे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले. “स्वार्थाच्या ट्रक खाली निष्ठेचा बळी दिल्याचे महाराष्ट्र पाहतो आहे. सरकार योजनांची पुंगी वाजवत असून याला भुलू नका. महाराष्ट्र निष्ठावान माणसांची नावे कोरतो गद्दारांची नाही. देव बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर पुजारी बदलावा लागेल.” असा टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वळसे पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला. “शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्यांचा विचार न करणाऱ्या राज्य सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे. आगामी काळात राज्यात आघाडी सरकार सत्तेवर येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आंबेगावकरांनी आंबेगाव मधून आघाडीचा आमदार करावा.” असे आवाहन खासदार कोल्हे यांनी जनतेला केले. देवदत्त निकम म्हणाले धन दांडग्या शक्ती विरुद्ध आपल्याला लढायचे आहे. सामान्य माणूस एका बाजूला असताना पुढे विविध संस्थांच्या कर्मचाऱ्यांना काम देवून यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला. आयुष्यात मी कधीही चुकीचे केले नाही. सत्तेचा गैरवापर करून निकम यांना जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होतोय. माझे काय व्हायचे ते होईल तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आगामी काळात तालुक्यातील एकाधिकरशाही मोडून काढणार असून आगामी काळात तालुक्याचा लोकप्रतिनिधी महाविकास आघाडीचाच असेल, असे निकम म्हणाले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.