साय-फाय – नामशेष होत चाललेली गिधाडे आणि निसर्गचक्राचा तोल

>> प्रसाद ताम्हनकर

निसर्गचक्रात मनुष्य असो वा पशुपक्षी, या प्रत्येकाचे स्वतचे एक महत्त्व आहे. यातील एका प्रजातीच्या नामशेष होण्याने निसर्गचक्राचा तोल कसा ढासळतो, याचे एक अत्यंत चिंताजनक उदाहरण नुकतेच अभ्यासातून पुढे आले आहे. हिंदुस्थानात नामशेष होत चाललेल्या गिधाडांच्या संख्येचा परिणाम होऊन पाच वर्षांत पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गिधाडांची कमी होत चाललेली संख्या या मानवी मृत्यूला कशी कारणीभूत ठरते आहे याचा एक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

`डायक्लोफेनाक’ हे गुरांसाठी स्वस्त आणि नॉन-स्टिरॉइडल असलेले वेदनाशामक औषध गिधाडांसाठी अत्यंत घातक आहे. या औषधाचा उपचार केलेल्या पशूंच्या मृतदेहाचे मांस खाल्ल्याने 50 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या गिधाडांची संख्या 1990 च्या मध्यापर्यंत जवळपास शून्यावर आली होती. या औषधाच्या दुष्परिणामामुळे गिधाडांच्या किडन्या फेल होऊन त्यांचा मृत्यू होतो. मात्र आता स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्सच्या एका नवीन अहवालानुसार 2006 मध्ये प्राण्यांवर उपचार करण्यासाठी डायक्लोफेनाक औषधाच्या वापरावर बंदी घातल्याने काही भागात गिधाडांच्या मृत्यूत घट झाली आहे, परंतु गिधाडांच्या कमीत कमी तीन प्रजाती अशा आहेत, ज्यांच्यावर दीर्घकालीन परिणाम झाला आहे आणि त्यांच्या संख्येत 91 ते 98 टक्क्यांपर्यंत घट झालेली आहे.

गिधाडांच्या अशा वाढत्या मृत्यूंमुळे अनेक घातक जिवाणू आणि त्यांचा संसर्ग वेगाने पसरण्यास मदत झाली. गिधाडांना निसर्गाचा स्वच्छता दूत मानले जाते. प्राण्यांचे मृतदेह खाऊन ते निसर्गाची स्वच्छता तर राखतातच, पण जोडीला घातक रोगराई पसरू नये याचीदेखील काळजी घेतात. याचे उदाहरण देताना संशोधक गिधाडांच्या घटत्या संख्येमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनाला आणतात. या भटक्या कुत्र्यांमुळे मोठ्या प्रमाणावर रेबीजचा धोका अचानक वाढला. मात्र त्या प्रमाणात रेबीजची लस उपलब्ध होऊ शकली नाही. ज्याप्रमाणे गिधाडे जनावरांचे कुजलेले मृतदेह नष्ट करतात, तसे कार्य ही भटकी कुत्री करू शकत नाहीत. याचा परिणाम घातक जंतू आणि रोगराई वेगाने पसरण्यावर होतो.

गिधाडांची वेगाने झालेली ही घट आणि त्याचा मानवी जीवनावर झालेला परिणाम हा अत्यंत चिंताजनक आहे. या घटनेची नोंद जगातील अनेक शास्त्रज्ञांनी घेतली असून त्यांनी यावर आपला अभ्यासदेखील सुरू केला आहे. 2019 साली हिंदुस्थानात झालेल्या पशुगणनेत 50 कोटी पशूंची नोंद करण्यात आली होती. ती जगातील सर्वात मोठी संख्या होती. मात्र आता गिधाडांचे वेगाने नामशेष होणे हे यापूर्वी कोणत्याही पक्ष्याच्या प्रजातीत झालेल्या घटीपेक्षा अधिक वेगवान आहे. यापूर्वी अमेरिकेतील कबुतरांमध्ये अशी वेगवान घट बघण्यात आली होती.

इजिप्शियन गिधाडं आणि स्थलांतरित ग्रिफॉन गिधाडांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. सर्वात जास्त नुकसान झालेल्या गिधाडांच्या प्रजातींमध्ये पांढरे पंख असलेली गिधाडं, हिंदुस्थानी गिधाडं आणि लाल गिधाडं यांचा समावेश आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनची ही सर्वात लक्षणीय घट मानली जात आहे. 2000 सालापासून या प्रजातींची संख्या अपामे 98 टक्के, 95 टक्के आणि 91 टक्के इतकी घटली आहे. खाणकाम आणि उत्खनन हीदेखील गिधाडे नामशेष होत जाण्यामागे दोन प्रमुख कारणं असल्याचे संशोधक सांगतात. या कामांमुळे गिधाडांच्या घरटी बांधण्यावर परिणाम होतो आणि त्यांच्या सहवासाला धोका निर्माण झाल्याने प्रजननातही घट आढळून येते.

गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सध्या मोहीम राबवली जात असून गेल्या वर्षी 20 गिधाडांचं संवर्धन करून त्यांना बंगालच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं आहे, तर दक्षिण हिंदुस्थानात केल्या गेलेल्या एका सर्व्हेत 300 गिधाडांची नोंद करण्यात आली आहे. गिधाडांसाठी सर्वात धोकादायक ठरत असलेल्या गुरांच्या औषधासंदर्भात काही ठोस उपाय करणे अत्यंत गरजेचं असल्याचं हा अभ्यास सांगतो. त्याचबरोबर हवामान बदलाचादेखील काही परिणाम गिधाडांच्या संख्येवर होत आहे का? याचा एक विशेष अभ्यास करणं आवश्यक आहे. निसर्गपातील एक कडीदेखील किती महत्त्वाची असते, हे यामुळे समोर आलं आहे.
[email protected]