>> आशुतोष बापट
सदाशिवाची मूर्ती मीठगवाणे इथल्या मंदिरावर असणे हे निश्चितच आगळेवेगळे लक्षण आहे. शैव पंथामध्ये पाशुपत संप्रदाय आहे. हा संप्रदाय शिवाच्या सदाशिव या रूपाला आपले आराध्य दैवत मानतो. म्हणूनच कोकणातल्या आडजागी वसलेल्या अंजनेश्वर मंदिरात सदाशिवाची मूर्ती आढळणे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सदाशिवाच्या मूर्तीशिवाय अंजनेश्वर मंदिरात अजूनही कोरीव शिल्पकाम बघायला मिळते.
सदाशिवाची मूर्ती मीठगवाणे इथल्या मंदिरावर असणे हे निश्चितच आगळेवेगळे लक्षण आहे. शैव पंथामध्ये पाशुपत संप्रदाय आहे. हा संप्रदाय शिवाच्या सदाशिव या रूपाला आपले आराध्य दैवत मानतो. सदाशिव म्हणजे परमोच्च, निराकार, तेजस्वी आणि सर्वव्यापी असा शिव होय. शिवाची पाच मुखे असलेली मूर्ती म्हणजे सदाशिवाची मूर्ती. ही पाच तोंडे म्हणजे पंचब्रह्म समजले गेले आहे. तत्पुरुष, अघोर, वामदेव, सद्योजात आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्थिती (आस्पेक्टस्) समजल्या जातात. `लकुलिश’ हा पाशुपत संप्रदायाचा संस्थापक आहे. याला शिवाचा 28वा अवतारसुद्धा मानतात. वराहपुराणानुसार शिवाने आपल्या 28व्या अवतारात गुजरातेतील डभोईजवळ कायावारोह इथे लकुलिश या नावाने जन्म घेतला. लकुलिशाच्या मूर्ती आपल्याला वेरूळच्या लेणीत बघायला मिळतात. तसेच गुजरातेत पावागड इथे लकुलिशाचे मंदिरसुद्धा आहे. सांगायची बाब अशी की, या पाशुपत मंडळींचे सदाशिव हे आराध्य दैवत आहे. सदाशिवाची मूर्ती आपल्याला वेरूळ, घारापुरी, मार्कंडी (जि. गडचिरोली), खजुराहो, विदिशा इत्यादी ठिकाणी आढळून येतात.
सदाशिवाच्या मूर्तींपैकी सर्वोच्च मूर्ती म्हणजे चतुष्पाद सदाशिवमूर्ती म्हणावी लागेल. इथे शिवाला चार पाय दाखवलेले असतात. हे आश्चर्यच नव्हे काय ! परंतु यामागेसुद्धा काही तत्त्वज्ञान दडलेले आहे. पाशुपत संप्रदायाच्या मते त्यांचा संप्रदाय चार पायांवर आधारित आहे. चर्या, क्रिया, योग आणि ज्ञान असे ते चार पाय होत. हे पाय म्हणजे चार स्तंभच म्हणायला हवेत, ज्यावर पाशुपत संप्रदाय उभा आहे. तर या चार खांबांचे किंवा चार पायांचे प्रतीक म्हणून या मंडळींनी शिवाची, त्यांच्या आराध्य दैवताची मूर्तीच मुळी चार पायांची घडवली. यातले दोन पाय पद्मासनात असतात तर उर्वरित दोन पाय खाली सोडलेले दाखवले आहेत. या आगळ्यावेगळ्या वैशिष्टय़ामुळे या मूर्तीला `विलक्षण चतुष्पाद सदाशिव’ असे म्हणतात. खजुराहो इथल्या कंदारिया महादेव मंदिरात आणि मार्कंडी इथल्या मंदिरात आपल्याला विलक्षण चतुष्पाद सदाशिवाच्या मूर्ती बघायला मिळतात. पाशुपत संप्रदायाचा प्रसार एवढय़ा ठिकाणी झाला असल्याचे दिसून येते. त्यामुळेच कोकणातल्या आडजागी वसलेल्या अंजनेश्वर मंदिरात सदाशिवाची मूर्ती आढळणे वैशिष्टय़पूर्ण ठरते. पाशुपत मंडळींचे हे उपासना केंद्र असेल का? सध्या तरी केवळ अंदाजच करावा लागतो. सदाशिवाच्या मूर्तीशिवाय अंजनेश्वर मंदिरात अजूनही कोरीव शिल्पकाम बघायला मिळते.
इथल्या खांबांवर पशुपक्षी कोरलेले आहेत. त्याचबरोबर इथल्या तुळईवर कोरलेले शेषशायी विष्णूचे शिल्प बघत बसावे असे आहे. गाभाऱ्याच्या बाहेर काळ्या पाषाणातली नंदीची सुबक मूर्ती आहे. नंदीच्या पाठीवर असलेली झूल आणि त्याची शिंगे खूप सुंदर दिसतात. गाभाऱ्याचे शिखर वेगळ्या धाटणीचे व कौलारू आहे. पुण्यातील जुन्या मंडईच्या शिखरासारखी ही कौलारू रचना आहे. आवर्जून पाहावी असे हे वेगळेपण आहे.
अंजनेश्वर हे शिवालय बारा गावांचे श्रद्धास्थान आहे. मजरे, जानशी, बाकाळे, तिवरांबी, माडबन, निवेली, हुरसे, होळी, दळे, चव्हाणवाडी, भंडार-साखरी, कुवेशी, करेल अशी ही बारा गावे होत. गोखले, देसाई हे या देवस्थानचे मानकरी आहेत. होळीचा उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वरील बारा गावांतील खोत घराण्यांकडून प्रमाने दरवर्षी अंजनेश्वराला होळीसाठी पोफळीचे झाड विधीपूर्वक इथे आणले जाते. त्या वेळी सगळे ग्रामस्थ देवाचे निशाण, ढोल, वाजंत्री घेऊन मोठय़ा लव्याजम्याने देवळात जमतात आणि पोफळीचे झाड नाचवीत अंजनेश्वराच्या देवळाजवळ आणून ठरावीक जागी, ज्याला मांड असे म्हणतात त्या ठिकाणी उभी करून त्याची विधिवत पूजा करतात. मंदिराच्या आवारात कालभैरवाचे देऊळ असून त्यातही एक शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाच मुख असलेले होते, पण आता त्याची खूपच झीज झाली आहे. पाच मुखांचे इथले शिवलिंग आणि मुख्य मंदिरात खांबावर असलेल्या पाच मुखांच्या सदाशिवाची मूर्ती यांचा काहीतरी संबंध नक्की असणार.
अत्यंत शांत परिसर, पाठीमागे डोंगर, समोर नितांत सुंदर शिवालय आणि आजूबाजूला हिरवीगार वनश्री असा हा सगळा मीठगवाण्याचा परिसर. राजापूर परिसरात भटकताना या अंजनेश्वराचे दर्शन घेणे क्रमप्राप्त आहे. इथली कमालीची शांतता अनुभवावी, इथला निसर्ग डोळे भरून बघून घ्यावा. आपली भटकंती समृद्ध व्हावी.
– [email protected]
(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)