मराठी चित्रपटसृष्टी, छोट्या पडद्यावरील मालिका आणि रंगभूमीवर बहुरंगी भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. दरम्यान, विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवारातील स्मशानभूमीमध्ये दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे.
विजय दत्ताराम कदम हे त्यांचे पूर्ण नाव असून 1980 च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. लहानपणी ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रंगभूमीचा मार्ग निवडला.
विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘रथचक्र’, व ‘टूरटूर’ ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. ‘टूरटूर’ या नाटकाने त्यांना लोकमान्यता, तर ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने राजमान्यता मिळवून दिली. या नाटकाचे विजय कदम यांनी 1986 पासून 750 हून जास्त प्रयोग केले.
दरम्यान, मराठी चित्रपट क्षेत्रावरही त्यांनी स्वत:ची पकड मजबूत ठेवली होती. ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ आणि ‘आम्ही दोघं राजा राणी’ या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय कदम यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. ‘मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जेष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं.मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले’, असे ट्विट शरद पवार यांनी केले.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जेष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं.मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.
अशा… pic.twitter.com/iAPv5BGxks— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 10, 2024