शंभर ग्रॅम वजनाचा घोळ झाला म्हणून विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ‘पदक’ गमावले. विनेशने जिंकलेली कुस्ती हरली. आपण काय केले? या घटनेने आपला देश फक्त स्तब्ध झाला. विश्वगुरूंच्या भारताने ‘जोर’ लावला नाही, जे केनियासारखा लहान देश त्यांच्या खेळाडूंवरील अन्यायाविरुद्ध करू शकला. आपण फक्त स्तब्ध झालो!
विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल गमावले, त्याबद्दल भारतात फक्त हळहळ व्यक्त झाली. भारत हा पूर्णपणे क्रिकेटमय झालेला देश आहे. क्रिकेटमध्ये भारताचा पराभव होतो तेव्हा संपूर्ण देशालाच सुतक लागल्याचे वातावरण तयार होते. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप हरला तेव्हा असंख्य घरांत चुली पेटल्या नाहीत, पण कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारून जिंकलेले पदक गमावले तेव्हा किती जणांना खरंच दुःख झाले? विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटात कुस्ती मारली, पण अंतिम सामन्यात तिचे वजन शंभर ग्रामने वाढले म्हणून तिला स्पर्धेतून आणि आालिम्पिकमधूनच बाद केले व याविरोधात भारताच्या ऑलिम्पिक संघटनेने जोरदार दाद मागितली नाही. पंतप्रधान मोदी हे रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवू शकतात. (अशी त्यांच्या अंधभक्तांची अंधश्रद्धा.) विश्वगुरू म्हणून ते जगात स्वतःच्या ताकदीचा डंका वाजवू शकतात. मोदींना सर्व काही मुमकीन आहे असे सांगितले जाते, पण पारिसच्या ऑलिम्पिकमध्ये एका भारतीय महिला कुस्तीपटूवर अन्याय झाला. त्या महिलेस ते न्याय देऊ शकले नाहीत व विनेश फोगाटने जिंकलेला डाव गमावला. फोगाटने आता कुस्तीलाच रामराम केला. हे दुःखद आणि दुर्दैवी आहे!
नवी दंगल
अमीर खानने ‘दंगल’ चित्रपटाची निर्मिती केली. कुस्ती क्षेत्रातील दोन मुलींच्या संघर्षाची, तिच्या वडिलांच्या लढ्याची, मान-अपमानाची व शेवटी त्यांच्या विजयाकडे झेपावण्याची ही कहाणी. हरयाणातील फोगाट भगिनींच्या जीवनावरच हा चित्रपट निर्माण झाला. हे कथानक रोमांचक व थरारक होते. कुस्तीच्या क्षेत्रात कोणते राजकारण चालते ते यानिमित्ताने पडद्यावर दिसले. भारताच्या कुस्ती संघटनेत महिला कुस्तीपटूंना कोणत्या दिव्यातून जावे लागते ते याच विनेश फोगाटने जगासमोर आणले. प्रशिक्षणार्थी महिला कुस्तीपटूंच्या शोषणाविरुद्ध विनेश फोगाट व तिच्या सहकाऱ्यांना दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर आंदोलन करावे लागले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला गेला. भारताच्या या महान महिला कुस्तीपटूला पोलिसांनी फरफटत बाहेर काढले ते देशाने पाहिले. तरीही विनेश फोगाटने सराव केला व ऑलिम्पिकमध्ये धडक मारली, पण “आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये काय घडते पाहू,’’ असे फोगाट हिने पारिसला जाण्यापूर्वीच सांगितले. विनेश फोगाटने सुवर्ण पदक निश्चित केले होते. ते गळय़ात पडण्यापूर्वीच तिला बाद केले गे}s व देश फक्त स्तब्ध झाला. स्पर्धेतून कोणाला अन्याय्य पद्धतीने बाद केले असेल तर त्याविरोधात अपील करण्याची मुभा ऑलिम्पिकमध्ये आहे. पारिस ऑलिम्पिकमध्येच हे घडलंय. फक्त त्या देशात दम असायला हवा. केनियासारख्या लहान आणि कमजोर देशाला जे जमले ते भारताच्या बोलघेवड्या नेत्यांना व विश्वगुरू पंतप्रधानांना का जमले नाही? केनियाच्या Faith Kipyegon या खेळाडूने 5 हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. तिला विनेश फोगाटप्रमाणे बाद करण्यात आले. तिचे रौप्य पदक काढून घेतले. केनियाच्या सरकारने व ऑलिम्पिक प्रशासनाने पूर्ण ताकद लावली. आपल्या खेळाडूवरील अपात्रतेचा निर्णय रद्द करून घेतला. तिला तिचे रौप्य पदक परत मिळवून दिले. सरकारमध्ये ‘दम’ असला की, असे घडते. आता एक नवीनच माहिती समोर आली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हिसकावून घेताच भारत देश व त्या देशाचे शासन फक्त स्तब्ध झाले, पण निराश होऊनही विनेश अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभी राहिली. विनेश व्यक्तिगतरीत्या आर्बिटेशनमध्ये गेली. त्यानंतर आता आपली लाज जाईल म्हणून भारतीय ऑलिम्पिक संघटनेने तिला सपोर्ट केला. पारिसमधील काही स्वयंसेवी वकील, स्वयंसेवी संघटना, PRO BONO तिचा खटला लढतील. PRO BONO म्हणजे मोफत सेवा. हे सर्व फोगाटने स्वतः केले. तोपर्यंत आपली ऑलिम्पिक संघटना काय करत होती? भारताची ऑलिम्पिक संघटना कुचकामी ठरली आहे. भारताला शक्य असेल तर ती बरखास्तच केली पाहिजे.
केस कापले तरी
विनेश फोगाटचे वजन शंभर ग्रामने वाढले. विनेशच्या डोक्यावरचे केस कापले असते तरी शंभर ग्राम कमी झाले असते. शंभर ग्राम हा काय अपात्र ठरण्याचा ‘आकडा’ झाला? विनेश फोगाटचे वजन ‘सेमीफायनल’नंतर कसे वाढले? सेमी फायनलच्या विजयानंतर वजन वाढले त्या वेळी तिचे प्रशिक्षक व इतर वैद्यकीय अधिकारी काय करत होते? भारतीय कुस्ती संघटनेच्या दळभद्री राजकारणात विनेशने पारिस ऑलिम्पिकमधले कुस्तीतले सुवर्ण पदक गमावले काय? कुस्ती संघातील शोषणाविरुद्ध विनेशने आवाज उठवला तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी मौनव्रत धारण केले होते. ते मौनव्रत त्यांनी विनेशने ‘पदक’ गमावल्यावर सोडले. “देश की बेटी’’ असा उल्लेख करत पंतप्रधानांनी तिला धीर दिला व देश तुझ्या पाठीशी आहे असे सांगितले. त्याने काय होणार? काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत सांगितले की, “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळय़ा फुटताना दिसतात.’’ हेच सत्य आहे. भारताच्या आनंदावर ‘शंभर’ ग्राम भारी पडले. संशयास्पद शंभर ग्रामने भारताचा आनंद हिरावून घेतला. विश्वगुरू व त्यांचा सत्ताधारी पक्ष युक्रेनचे रशियाबरोबरचे युद्ध थांबवू शकले, पण ज्या फ्रान्सकडून ‘राफेल’ विकत घेतले, त्या फ्रान्समध्ये शंभर ग्राममुळे गमावलेले पदक मिळवू शकले नाहीत.
पचले नसते
विनेश फोगाटचे सुवर्ण पदक मोदी व त्यांच्या लोकांना पचवणे कठीण गेले असते. कारण विनेश ही भाजपची ‘लाडकी कन्या’ किंवा ‘लाडकी बहीण’ नाही. लाडक्या बहिणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करत नाहीत. विनेशने ती चूक केली. ‘जंतर मंतर’वर तिने देशातील असंख्य लाडक्या बहिणी व कन्यांवरील शोषणाविरुद्ध आवाज उठवला. अनेक रात्री त्यासाठी दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर जागून काढल्या. न्याय मिळत नाही व भाजपचे सरकार ऐकत नाही हे दिसल्यावर विनेशने सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके पंतप्रधानांच्या दारात ठेवली. विनेशला बदनाम करण्याची एकही संधी तेव्हा भाजपने सोडली नव्हती. अशा विनेशला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळणे म्हणजे भाजप सरकारला थप्पड बसण्यासारखेच आहे. देशाची पाचवी अर्थव्यवस्था व त्या व्यवस्थेचे विश्वगुरू आपल्या लाडक्या कन्येच्या पाठीशी उभे राहिले नाहीत याची नोंद इतिहासात राहील. विनेश फोगाटला भारताच्या राजकीय सडक्या व्यवस्थेने हरवले हेसुद्धा त्या इतिहासात रेखांकित केले जाईल. विनेश फोगाट देशाची कन्या आहे. त्या कन्येसाठी आता देश काय करणार? देशाचे क्रीडा मंत्री संसदेत सांगतात, विनेश फोगाटच्या प्रशिक्षणासाठी सरकारने 77 लाख रुपये खर्च केले. हे पैसे भाजपने त्यांच्या निवडणूक निधीच्या खात्यातून दिले नाहीत. हे जनतेचे पैसे आहेत. फोगाट लढली, जिंकली व हरली. देश फक्त स्तब्ध झाला. सत्ताधाऱ्यांनी चेहऱ्यावर दुःख दाखवले, पण आतून त्यांना आनंदाच्या उकळय़ा फुटल्या. या कन्येसाठी देश काय करणार? तिला भारतरत्न देणार? जरूर द्या. विनेशला राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत एकमताने पाठवून तिचा सन्मान करा.
भारतातील जे लोक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य आहेत, त्यांनी निषेध म्हणून लगेच राजीनामाच द्यायला हवा.
नुसते स्तब्ध होऊन काय करणार?
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]