रौप्य जिंकून हिंदुस्थानला पदक मिळवून दिल्याचा निश्चितच अभिमान आहे, पण टोकियोप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘जन गण मन’चे सूर घुमवता न आल्याचेही दुःख आहे. जोपर्यंत शरीरात जोर आहे तोपर्यंत देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन, अशा भावना व्यक्त केल्या भालाफेकपटू नीरज चोप्राने.
हिंदुस्थानी ऑलिम्पिक पथकाचे शेवटचे आशास्थान नीरज चोप्रा होता, जो हिंदुस्थानला सुवर्ण यश मिळवून देईल. पण भालाफेकीच्या संघर्षात त्याला आपले सुवर्ण कायम राखण्यात अपयश आले. नीरजने आपली मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत 89.45 मीटर फेक ही सर्वोत्तम कामगिरी केली. पण त्याला पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या ऑलिम्पिक विक्रम करणाऱ्या 92.97 मीटर या फेकीला मागे टाकता आले नाही.
हिंदुस्थानला रौप्य मिळवून दिल्यानंतर नीरजच्या चेहऱ्यावर सुवर्ण न राखता आल्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. पण तो म्हणाला, नदीमच्या विक्रमी फेकीनंतर मला माझ्यावरही विश्वास होता की मीसुद्धा चांगली फेक करू शकतो. मी ती फेक केलीही. हा खेळ असा आहे की ज्याचा दिवस असतो तो काहीही करू शकतो. आज नदीमचा दिवस होता. त्याने चांगली फेक केली. मला आज रनअप घेताना अडचणी येत होत्या. त्यामुळे माझे पाच प्रयत्न अपयशी ठरले. हा खेळ दुखापतींचा असल्यामुळे स्वतःला दुखापत होणार नाही, याची काळजी घेत आम्ही भालाफेक करत असतो. तुमचा रनअप आणि तुमच्या पायाच्या हालचाली योग्य झाल्या की तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा दोन-चार मीटर जास्त भाला फेकता. मी तिथे काहीसा कमी पडल्याचेही नीरज म्हणाला.
या खेळात जिंकतो त्याचे अभिनंदन करायलाच हवे. गेली आठ वर्षे मी अर्शद नदीमबरोबर खेळतोय आणि तो पहिल्यांदाच माझ्याबरोबर जिंकलाय. पण नदीमच्या यशानंतर आशियाई देशांमध्ये आमचा खेळ नक्कीच वाढेल आणि अनेक खेळाडू या खेळाची निवड करतील, असा विश्वासही नीरजने बोलून दाखवला.