महाराष्ट्रातून खोके सरकार आणि भाजपला पूर्णपणे हद्दपार करायचेय

महाराष्ट्राला लुटणाऱया घटनाबाह्य खोके सरकारला सत्तेतून खाली खेचायचे आणि महाराष्ट्रावर वारंवार दरोडे घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे हद्दपार करायचे ही जनभावना आहे आणि महाविकास आघाडीनेही तसाच निर्धार केला आहे, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आज म्हणाले.

महाराष्ट्रात पैशांचे घाणेरडे, विषारी राजकारण सुरू असून त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस, भाजप आणि अमित शहा आहेत, असा घणाघात करतानाच, मिंधे आणि भाजपला शेख हसीनांसारखे पळवून पळवून बाहेर काढायचे अशी लोकांची इच्छा आहे. पण महाविकास आघाडी लोकशाही पद्धतीने त्यांना बाहेर काढेल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांनी आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. जागावाटपाची चर्चा सुरू असून प्रत्येक जागेवर जिंकून येईल असे उमेदवार उभे करायचे यावर एकमत झाल्याचेही ते म्हणाले.

धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे

धारावी पुनर्वसन आणि अदानींचा मुद्दाही यावेळी माध्यमांनी छेडला असता, अदानी हा मोठा चर्चेचा विषय नाही तर धारावीवर चर्चा व्हायला हवी, असे संजय राऊत म्हणाले. धारावी हा देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प असून 600 एकर भूखंडावर आठ लाख लोकांना घरे द्यायची आहेत. त्यामुळे तो एका व्यक्तीला पेलवेल का हा प्रश्न आहे. ज्या बिल्डरला निविदा मिळाली त्याने काम करायला कुणाचीही हरकत नाही, पण निविदेबाहेरच्या गोष्टी त्याला द्यायचा प्रयत्न कराल तर मुंबई उद्ध्वस्त होईल अशी शिवसेनेची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले.