गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेकदून दहा शिलेदारांचे उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल करण्यात आले.
गेली तीन वर्ष रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील 10 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 6 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. युवासेनेकडून सर्वच्या सर्व 10 जागावर शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. सिनेट पदवीधर सदस्य निवडणुकीचे मतदान 22 सप्टेंबरला होणार आहे.
सिनेटच्या दहा जागांच्या निवडणुकीसाठी पाच खुल्या प्रवर्गातून, एससी, एनटी, महिला, एसटी, ओबीसी प्रवर्गातून प्रत्येकी 1 जागा आहे. अर्ज स्विकारण्याची मुदत 12 ऑगस्ट पर्यंत आहे. 16 ऑगस्टला अर्ज छाननी होणार आहे तर 26 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 22 सप्टेंबरला सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 25 सप्टेंबरला मतमोजणीला सुरुवात होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
‘हे’ आहेत युवासेनेचे उमेदवार
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांचे आशिर्वाद घेऊन युवासेनेच्या 10 उमेदवारांनी सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यापीठाच्या पर्ह्ट पॅम्पस येथील निवडणूक कार्यालयात दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
खुला प्रवर्ग – प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, अल्पेश भोईर, किसन सावंत. महिला – स्नेहा गवळी, एससी – शीतल शेठ, ओबीसी – मयूर पांचाळ, एसटी – धनराज कोहचाडे, एनटी – शशिकांत झोरे
पाच नवीन चेहऱ्यांना संधी
पदवीधर सिनेट निवडणुकीसाठी युवासेनेकडून पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात शिवसेना, युवासेनेत सक्रिय असलेल्या तरुण चेहऱ्यांचा समावेश आहे. युवासेनेकडून परम यादव, अल्पेश भोईर, किसन सावंत, स्नेहा गवळी, मयूर पांचाळ यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे.