नागपूरहून थेट मुंबईत! समृद्धी महामार्ग सप्टेंबरपासून पूर्णपणे वाहतुकीस खुला होणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील आत्तापर्यंतच्या सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी ते आमणे (जिल्हा ठाणे) मार्गावरील वशाळेनजीक सर्वात कठीण पूल आणि आठ किलोमीटर बोगद्याचे काम  पूर्ण झाले असून या महामार्गावरून नागपूर ते मुंबईपर्यंतचा हा संपूर्ण टप्पा सप्टेंबर महिन्यापासून वाहतुकीस पूर्णपणे खुला होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी आज दिली.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे नगर जिह्यातील शिर्डी (कोकमठाण) ते नाशिक जिह्यातील भरवीर इंटरचेंजदरम्यान एकूण 80 कि.मी. लांबीचे लोकार्पण झाले होते. तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी या 25 कि.मी.च्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मार्च 2024 मध्ये झाले.

एकूण 701 कि.मी. पैकी 625 कि.मी. लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत 1 कोटी 18 लाखांहून अधिक वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. समृद्धी महामार्गाची उर्वरित 76 कि.मी. लांबी इगतपुरी ते आमणे सप्टेंबर 2024 पर्यंत वाहतुकीस सुरू करण्याची योजना असल्याचे अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

कसारा घाटाचा आठ मिनिटांत प्रवास

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि. मी. मध्ये  एकूण पाच बोगदे असून एकूण लांबी 11 कि.मी. आहे. त्यातील  इगतपुरी येथील आठ कि.मी.चा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच हा देशातील सर्वाधिक रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे. या बोगद्यामुळे अवघ्या आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे. कसारा घाटातील धोकादायक प्रवास या बोगद्यामुळे करावा लागणार नाही. या बोगद्यात अग्निशमन, व्हेंटिलेशन, पंट्रोल रूमसुद्धा आहे. एखाद्या वाहनास आग लागलीच तर केवळ  60 मीटर पसरेल असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.