अबब! अल्प उत्पन्न गटाचा फ्लॅट 2 कोटी 62 लाखांना, म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले

सर्वसामान्यांसाठी स्वस्तात घरे बांधणारी सरकारी यंत्रणा असा डंका पिटणाऱ्या म्हाडाच्या यंदाच्या सोडतीमधील घरांचे दर शुक्रवारी जाहीर झाले. विशेष म्हणजे, पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला खासगी विकासकांकडून मिळालेली घरेही लॉटरीत असून त्यांच्या किमती पाहून सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतील सस्मिरा येथील 550 चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल 2 कोटी 62 लाख आहे. याव्यतिरिक्त विजेत्यांना सेवाशुल्क आणि मालमत्ता कर भरावा लागेल. नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा प्लॅट कसा परवडणार? बँका त्यांना एवढे कर्ज देतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

म्हाडातर्फे गोरेगाव पश्चिम, अॅण्टॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2030 घरांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 359, अल्प उत्पन्न गटासाठी 627, मध्यम उत्पन्न गटासाठी 768, उच्च उत्पन्न गटासाठी 276 घरे आहेत. यासह मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327, पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून प्राप्त गृहसाठय़ामध्ये मिळालेल्या 370 व मागील सोडतीतील विखुरलेल्या 333 घरांचाही समावेश आहे. आचारसंहितेपूर्वी सोडत काढण्याचा म्हाडाने घाट घातल्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी कमी दिवसांचा कालावधी मिळाल्याने अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.

29 लाखांपासून 7.50 कोटीपर्यंतची घरे

अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वात कमी किमतीचा फ्लॅट मानखुर्द पीएमजीपी कॉलनी येथे असून त्याची पिंमत 29 लाख 37 हजार रुपये आहे. तर लॉटरीतील उच्च उत्पन्न गटासाठीचा सर्वात महागडा फ्लॅट 7 कोटी 57 लाख रुपयांचा असून हा फ्लॅट ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये आहे.

पहिल्याच दिवशी 246 अर्ज

पहिल्याच दिवशी घरासाठी सायंकाळी साडेसात पर्यंत 246 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 132 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. इच्छुकांना 4 सप्टेंबरेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. संगणकीय सोडत 13 सप्टेंबरला आहे.

म्हाडा म्हणतेय, बाजारभावापेक्षा आमचे दर कमीच

खासगी विकासकांकडून म्हाडाला गृहसाठय़ामध्ये मिळालेल्या घराच्या किमती कोटय़वधी रुपयांमध्ये असल्या तरी ही घरे मोक्याच्या ठिकाणी असून त्यांचे दर बाजारभावापेक्षा नक्कीच कमी आहेत, असा दावा म्हाडातर्फे करण्यात आला आहे.