हातात पिस्तुल घेऊन तिहारचा जेलर थिरकला; भाजप नगरसेविकेच्या पतीची बर्थ डे पार्टी चर्चेत

तिहार तुरुंगातील जेलर दीपक शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शर्मा यांचा भाजपच्या नगरसेविकेच्या पतीच्या बर्थ डे पार्टीतील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दीपक शर्मा हे एका पार्टीत हातात पिस्तुल घेऊन ‘नायक नहीं खलनायक हूं मै’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यादरम्यान पार्टीत उपस्थित एका व्यक्तीने त्यांचा हातात पिस्तुल घेऊन नाचतानाच व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शर्मा यांच्याकडील पिस्तुल परवानाधारक आहे की नाही, याबाबत दिल्ली पोलीस तपास करत आहेत. पिस्तुल परवानाधारक असली तरी तिहार तुरुंग प्रशासन शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे दिल्ली पोलीस सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या नगरसेविकेच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी रात्री घोंडा येथे पार्टीचे आयोजित करण्यात आली होती. दीपक शर्मा हे देखील या पार्टीत सहभागी झाले होते. बर्थ डे पार्टीत पिस्तुल हातात घेऊन शर्मा मित्रांसोबत खलनायक गाण्यावर डान्स करु लागले. तिहार तुरुंग प्रशासनही या व्हिडिओ प्रकरणाचा तपास करत असून शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

शर्मावर कडक कारवाईची तयारी

दीपक शर्मा यांच्या गैरकृत्याची माहिती मिळत आहे. शर्मा हे सोशल मीडियावर सक्रिय राहतात. हे तुरुंगाच्या नियमांच्या विरोधात असून शर्मा यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे तिहार तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.