Pune Hit And Run – कारने दुचाकीस्वाराला फरफटत नेले, पिंपळे गुरवमधील भयंकर घटना समोर

पुण्यात अपघातांची मालिका थांबतच नाहीये. आता पुन्हा एकदा पिंपळे गुरव मेन बस स्टॉपजवळ हीट अँड रनची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अपघाताची ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. भरधाव कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. इतकेच नव्हे तर त्याने दुचाकीस्वाराला फरफटत नेले. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेतील आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. पोलिसांनी तात्काळ या अपघाताची दखल घेतली असून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर काही शहरांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. या अपघातांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा वाढत्या घटनांवर जनसामान्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.