Manish Sisodia grants bail : मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; 17 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जवळपास 17 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींसह हा जामीन मंजूर केला असून त्यानुसार सिसोदिया यांना आपला पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. तसेच प्रत्येक सोमवारी पोलीस स्थानकात हजर रहावे लागणार असून साक्षिदारांवर दबाव टाकू नये असेही निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यांमध्ये दिरंगाई होत असल्याकडे लक्ष वेधत सिसोदिया यांनी जामिनाची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. न्यायालयाने 6 ऑगस्ट रोजी याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी हा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन मंजूर केला.