केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी मुंबईतील एका ज्वेलर्सकडून 20 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक केली. ED च्या संचालकाने ज्वेलर्सच्या मुलाला अटक न करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे.
ED ने 3 आणि 4 ऑगस्ट रोजी विपुल हरीश ठक्कर या ज्वेलर्सच्या घराची झडती घेतली होती. सीबीआयने केलेल्या तपासानुसार, सहाय्यक संचालक संदीप सिंह यादव यांनी ठक्कर यांच्या मुलाला 25 लाख रुपये न दिल्यास त्याला अटक करण्याची धमकी दिली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमधील वाटाघाटीनंतर ही रक्कम 20 लाख रुपये करण्यात आली. लाचेची रक्कम दिल्यानंतर ज्वेलरने या घटनेबाबत CBI कडे धाव घेतली.
‘स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करताना प्रथमदर्शनी उघड झाले की संदीप सिंग, सहाय्यक संचालक, सक्तवसुली संचालनालय मुख्यालय, नवी दिल्ली यांनी अज्ञात इतरांसोबत 20 लाख रुपयांचा अवाजवी फायदा मिळवण्यासाठी स्वत: आणि इतरांमार्फत रचलेला गुन्हेगारी कट आहे. तक्रारदार विपुल ठक्कर याच्याकडून अन्य व्यक्तीने त्याचा मुलगा निहार ठक्कर याला ED कडून तपास करत असलेल्या प्रकरणामध्ये अटक न करण्या करता ही रक्कम घेतल्याचं, CBI च्या FIR मध्ये म्हटले आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अधिकारी असलेल्या यादवला एजन्सीच्या मुंबई युनिटने दिल्लीत लाच घेताना रंगेहात पकडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ED च्या अधिकाऱ्याला दिल्लीतील लाजपत नगर परिसरातून अटक करण्यात आली, असे CBI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTI ला सांगितले. ज्वेलरच्या मदतीने आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचल्यानंतर तपास यंत्रणेने अटकेची कारवाई केली.
महत्त्वाचे म्हणजे, ऑगस्ट 2023 मध्ये, CBI ने दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीतील व्यापारी अमन धल्ल यांना वाचवण्यासाठी ₹ 5 कोटींची लाच स्वीकारल्याबद्दल ED च्या सहाय्यक संचालकासह इतर सहा अधिकाऱ्यांना अटक केली होती.
cbi arrests ed assistant director