Kolhapur news : सहा जिल्ह्यांतील वकिलांची उद्या कोल्हापुरात परिषद; अडीच हजार वकील सहभागी होणार

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिह्यांसाठी कोल्हापूर या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी गेल्या 35 वर्षांपासून वकील आंदोलन करीत आहेत. नेतेमंडळींच्या अनास्थेमुळे हा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी (दि. 10) कोल्हापुरात वकील परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये सहा जिह्यांतील 2500पेक्षा जास्त वकील सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ऍड. सर्जेराव खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महासैनिक दरबार हॉलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ही वकील परिषद होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा सहा जिह्यांतील बारच्या पदाधिकाऱयांशी संपर्क झाला आहे. पावसामुळे काही वकील खासगी बस ठरवून दाखल होणार आहेत. वकिलांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र ऍण्ड गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. विवेक घाटगे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. महादेव आडगुळे, बारचे माजी अध्यक्ष शिवाजी राणे, ऍड. रणजित गावडे, ऍड. प्रकाश मोरे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

ऍड. खोत म्हणाले, ‘उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांनी 2015 मध्ये पदावरून निवृत्त होण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथेच होणे गरजेचे असल्याचा अहवाल तयार केला होता. मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती या दोघांची भेट झाल्यानंतर हा तिढा सुटणार आहे. कोल्हापूर बार असो.ने आजपर्यंत अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, ‘हा मुद्दा तुमच्या अधिकारात आहे, तातडीने सोडवावा’, असे सांगितले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शासनाने कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा वकिलांनी व्यक्त केली. वकील परिषदेत खंडपीठासाठी सर्वानुमते जो निर्णय होईल, त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचाही विचार असल्याचे यावेळी वकिलांनी सांगितले.