पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटले. आज राज्यसभेत विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. विनेश फोगाट अपात्र का ठरली? त्यामागे कोणती कारणे होती? या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सभापतींनी दैनंदिन कामकाजादरम्यान चर्चेस नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे संतापलेल्या सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना सुनावल्यानंतर विरोधकांनी सभात्याग करून सरकारचा निषेध केला.
या अपात्रतेला जबाबदार कोण आहे? हे देशाला कळले पाहिजे. असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. यावर राजकारण नको, मी अत्यंत दुःखी आहे. या विषयावर चर्चा करता येणार नाही. सभागृहाचा त्यासाठी वापर करता येणार नाही असे सभापती म्हणाले. त्यानंतर विरोधक आणखी संतापले आणि चर्चेची मागणी लावून धरली. त्यामुळे चिडलेल्या धनखड यांनी तृणमूलचे खासदार डेरेक ओ‘ब्रायन यांचे नाव घेत त्यांना खडे बोल सुनावले.