ईडीच्या लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षातील नेत्यांना खोटय़ा प्रकरणांत अडकवून तुरुंगात डांबणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यालाच सीबीआयने लाच घेताना रंगेहाथ पकडले. संदीप सिंह यादव असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो ईडीचा सहाय्यक संचालक आहे.

हिरे व्यापाऱ्याला खोटय़ा गुह्यात अडकविण्याची धमकी देऊन 20 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने  संदीप सिंह या ईडी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. ईडीचा सहाय्यक संचालकच लाच घेताना पकडल्यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.

सीबीआयला ईडीच्या सहाय्यक संचालकाने एका व्यावसायिकाकडून 20 लाखांची लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर सीबीआयने तत्काळ सापळा रचत ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

गेल्या वर्षी दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी उद्योजक अमन ढल्ल यांना दिलासा देण्याच्या बदल्यात तब्बल पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ईडीच्या एका सहाय्यक संचालकासहित अन्य सहा अधिकाऱ्यांना अटक केली होती.