हिंदुस्थानची गोल्डन गर्ल विनेश फोगाट हिनं तडकाफडकी कुस्तीला अलविदा केला. सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशनं ही माहिती देताच अवघा देश हळहळला.
विनेशने आईच्या नावाने पोस्ट लिहीत निवृत्ती घेतली. ‘आई… कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला. तुझं स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय. यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी तुमची ऋणी राहीन’, अशा भावना व्यक्त करत जड अंतःकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय कुस्तीला अलविदा म्हटलंय.
हक्काचा 53 किलो गट अंतिम पंघालसाठी लॉक झाल्यानंतर विनेश फोगाटला नाइलाजाने 50 किलो गटातून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवावे लागले. तिने तीन कुस्त्या जिंकत मोठय़ा थाटात ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, काही ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेशला सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं. सुवर्णपदक जिंकायचं होतं. मात्र, अखेरचा घाव घालण्यासाठी आखाडय़ात उतरण्यापूर्वीच ती अपात्र ठरली आणि स्वप्नभंग झाला.
याचिकेवर आज सुनावणी
कुस्तीपटू विनेश फोगाटला अधिक वजनामुळे फायनलच्या कुस्तीतून बाद ठरविल्यामुळे हिंदुस्थानी ऑलिम्पिक पथकाने या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी होणार होती. कॉर्ट ऑफ एर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशसाठी चार वकील दिले होते. मात्र, हिंदुस्थानी पथकाने स्वतःचा वकील देण्यासाठी वेळ मागितल्याने आता ही सुनावणी उद्या होणार आहे.