
पोलीस बनण्यासाठी राज्यातल्या विविध ठिकाणांहून मुंबईत हजारो तरुणी येत आहेत. पण या लाडक्या बहिणींकडे बघायलादेखील मिंधे सरकारकडे वेळ नाही. अत्यंत बिकट परिस्थितीत मैदानी चाचणीला सामोरे जावे लागत असल्याने या भावी पोलिसांमधून संताप व्यक्त होत आहे.
मुंबई पोलीस बनण्याचे स्वप्न घेऊन हजारो तरुणी मुंबईच्या विद्यापीठ मैदानात आपले नशीब आजमावण्यासाठी येत आहेत. काही अविवाहित तर काही विवहित असून बऱ्याच जणी आपल्या छोटय़ा मुलांना घेऊन येत आहेत. मरीन ड्राइव्ह येथे आल्यापासूनच लाडक्या बहिणींना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानाबाहेर पुठलीच सुविधा मिंधे सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेली नाही. बाकी काही नाही, पण फिरत्या शौचालयांची सुविधा पुरविण्यात आलेली नाही. पोलीस भरती सुरू असलेल्या मैदानाच्या आजूबाजूचा परिसर उच्चभ्रू आहे. त्यामुळे लघुशंका अथवा शौचास जायचे पुठे, असा यक्षप्रश्न लाडक्या बहिणींना भेडसावत आहे. दरम्यान, शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडून सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु निगरगट्ट गेंडय़ाच्या कातडीच्या सरकारला पाझर फुटत नसल्याचे चित्र आहे.
डास, दुर्गंधीने त्रस्त
भरतीसाठी येणाऱया तरुणी व त्यांच्या नातेवाईकांसाठी तेथे असलेला रेल्वेचा पादचारी पूल मोठा आसरा बनला आहे. तिथे ते सर्व जण बसतात व झोपतात. परंतु तेथे साफसफाई केली जात नसल्याने डास व दुर्गंधीने नकोसे केले आहे. परिणामी नीट झोप होत नाही, पोटात अन्न नसल्याने मैदानीला जाते वेळी उत्साह नसतो.
रहिवाशांनी सुरू केले अन्नछत्र
सरकारच्या भोंगळ कारभारामुळे फूटपाथवर अत्यंत दयनीय अवस्थेत बसावे, झोपावे आणि जेवण करावे लागत आहे. हे पाहून मनाला वेदना होतात अशा प्रतिक्रिया त्या परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. त्या परिसरात पाटण जैन मंडळाने या उमेदवारांसाठी अन्नछत्र सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी या तरुणींना पुरवण्यात येत आहेत.