कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करीत खासदार नीलेश लंके यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारासमोर कांदा तसेच शेतमालाच्या हमीभावासाठी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधले.
शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय , खाली डोकं वर पाय, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, किसान विरोधी मोदी सरकार शरम करो, शरम करो, किसान विरोधी मोदी सरकार हाय हाय, कीसान की फसल को एमएसपी दो, किसानपर अन्याय बंद करो अशी आक्रमक घोषणाबाजी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर दणाणून सोडला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. नीलेश लंके यांनी केले. आंदोलनात माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरूजी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी हे सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे घटकपक्ष असलेल्या टी डी पी, समाजवादी पार्टीच्या खासदारांनीही या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या या जिव्हाळयाच्या प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी केली.