रत्नागिरी जिल्ह्यातील एका शाळकरी मुलीच्या फुप्फुसात दोन इंचाची पिन अडकली होती. तातडीने पिन बाहेर काढली नसती तर मुलीच्या जीवाला धोका होता. त्यामुळे उपचारासाठी मुलीला खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील दाखल केले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी तातडीने उपचार करून पिन बाहेर काढली. देवदूत बनून डॉक्टर मदतीला धावल्याने मुलीचा जीव वाचला. राजापूर येथील 13 वर्षांच्या शाळकरी मुलीने चुकून पिन गिळली होती. रत्नागिरी येथील एका रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत मुलीच्या फुप्फुसात पिन अडकल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. यावेळी प्रसंगावधान राखत मेडिकवर हॉस्पिटलमधील फुप्फुस विकारतज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांच्या टिमने ब्रोन्कोस्कोपीद्वारे या मुलीच्या फुप्फुसातील पिन यशस्वीपणे बाहेर काढली. फुप्फुस आणि आसपासच्या अवयवांना इजा न पोहोचवता यशस्वी उपचार पार पडले. मुलीचा जीव वाचल्याने पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले.
50 मिनिटे घालमेल
फुप्फुसात अडकलेली पिन काढणे आव्हान होते. मुलगी किशोरवयीन असल्याने तिची श्वसननलिका लहान होती. पिन डाव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात अणकुचीदार होती. त्यामुळे तिला ताबडतोब आपत्कालीन उपचार देण्यात आले. 50 मिनिटांच्या उपचारानंतर पिन बाहेर काढण्यात यश आले, असे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी सांगितले.