चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे बसचा अपघात झाला आहे. चिमूर येथून 13 प्रवाशांना घेऊन वेगाने निघालेली बस येनोली माल येथील तलावाच्या वळणावर पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पलटी झाल्याने दरवाजातून निघण्याचा मार्ग बंद झाल्याने प्रवाशांना शिडी लावून बाहेर काढावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर स्थानकातील बस (क्र. एमएच 40, वाय 5267) चिमूर-व्हेरी व्हाया येनोली ते तळोधी येथे मार्गस्थ झाली होती. या बसमध्ये 13 प्रवासी होती. भरधाव वेगाने निघालेली बस येनोली माल तलावाच्या वळणावर आली असता पलटी झाली.
नोली माल तलावाच्या वळणावरील रस्ता अरुंद असल्याने चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये पलटी झाली. याची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसचा दरवाजा बंद झाल्याने प्रवाशांना खिडकीच्या मार्गाने शिडी लावून बाहेर काढण्यात आले. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.