लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल सवा लाख मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. लोकसभेला १८ विधानसभा मतदारसंघात ६६ लाख ७६ हजार ८३७ मतदार संख्या होती. आता मात्र मतदारांची संख्या ६८ लाख १ हजार २४४ इतकी पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी जोरात तयारीला लागले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ठाणे जिल्ह्यात मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार १०, ११, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला आहे.
ठाण्यात दोन महिन्यात सवा लाख मतदार वाढले जिल्हा प्रशासन विधानसभेच्या तयारीला लागले प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती घेण्यासाठी २९ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून ३० ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
■ ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ५ लाख २० हजार ९७७ एवढे सर्वाधिक मतदार आहेत.
■ उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात २ लाख ६२ हजार ४६६ सर्वात कमी मतदार आहेत.
नवमतदारांचा प्रतिसाद
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार ३६ लाख ५७ हजार ५१ असून ३१ लाख ४२ हजार ८५९ महिला मतदार आहेत. १ हजार ३३४ इतर मतदार आहेत, तर १ लाख १९ हजार ३२७ नवमतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. पूर्वी एक हजार पुरुषांच्या संख्येमागे ८५७ महिलांची संख्या होती. त्यामध्ये २ ने वाढ होऊन आता ही संख्या ८५९ इतकी झाली आहे.
गैरसोय टाळण्यासाठी
मतदार केंद्रात वाढ
लोकसभेला मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली गैरसोय टाळण्यासाठी विधानसभेसाठी २९० मतदान केंद्रे वाढविण्यात आली असून एकूण ६ हजार ८९४ केंद्रे असणार आहेत. तसेच शहरातील सोसायटीमधील मतदान केंद्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, मुरबाडमध्ये सर्वात जास्त तर उल्हासनगरमध्ये सर्वात कमी मतदार केंद्रे असणार आहेत.