सातत्याने सर्व्हर डाउन या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून रेशनवरील इ-पॉस मशीन बंद आहेत. गेल्या महिन्यात राज्याच्या प्रधान सचिवांशी चर्चा करूनसुद्धा याबाबत निर्णय झालेला नाही, त्यामुळे रेशनचे धान्य वितरण करण्यात येणाऱया अडचणींच्या निषेधार्थ राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, ई-पॉस मशीनबाबत लवकर मार्ग निघाला नाही तर ही सर्व मशीन ज्या त्या तहसीलदार कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक स्वरूपात एक मशीन प्रशासनाकडे जमा करण्यात आले.
राज्यात सुमारे 52 हजारहून अधिक स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर 2018 पासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. पण, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या मशीनवर धान्य वितरण करताना सातत्याने तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि मोलमजुरी कामगारांना धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. एकीकडे राज्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यसाठा उपलब्ध असतानाही केवळ तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण होऊ शकत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रारी देऊनही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, कॉ. चंद्रकांत यादव, अबू बारगीर, राजेश मंडलिक, संदीप पाटील, आनंदा लादे, संदीप लाटकर, श्रीपती पाटील, नींगू पाटील, पांडुरंग सुभेदार, दीपक चौगुले, संजय येसादे, दीपक शिराळे, गजानन हवालदार, विलास देशपांडे यांच्यासह रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते.