
मालमत्ता असेसमेंट उताऱयावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारल्याप्रकरणी सांगली महापालिका कर विभागातील दोघे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले.
याप्रकरणी कनिष्ठ लिपिक इम्रान अब्दुल रहमान देसाई (वय 35, रा. उदगाव वेस, झेंडे महाराज मठाजवळ, मिरज) आणि शिपाई राजेश संजीवन मोरे (वय 52, रा. मोरे बिल्डिंग, महादेव मंदिरामागे, चंदनवाडी, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱयांची नावे आहेत.
तक्रारदारांनी मालमत्ता खरेदी केली होती. असेसमेंट उताऱयावरील त्यांच्या काकांचे नाव कमी करून स्वतःच्या नावाची नोंद होऊन घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदारांनी मनपा कर विभागातील कनिष्ठ लिपिक इम्रान देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे 1 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारअर्ज केला होता.
सदर तक्रारीची शहानिशा केली असता यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले. लिपिक देसाई यांना लाच देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचे सिद्ध झाले. यानंतर मंगळवारी (दि. 6) सायंकाळी कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी दोघा संशयितांना तक्रारदारांकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.