उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला पूर आला आहे. गेले दोन दिवस नदीकाठची गावे चिंतेत होती. पंढरपूर येथील व्यासनारायण व अंबाबाई पटांगण झोपडपट्टीतील घरांमध्ये शिरलेले पाणी बुधवारी दुपारनंतर नदीपात्रात माघारी फिरले आहे. त्यामुळे या झोपडपट्टीतील घरांनी मोकळा श्वास घेतला आहे. तर उजनीच्या विसर्गात सातत्याने घट करण्यात येत आहे. सध्या उजनीतून 51 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपर्यंत ते गुरुवारी पहाटेपर्यंत पूर पूर्णतः कमी होईल, अशी परिस्थिती आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मंगळवारी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत पुराचे पाणी 1 लाख 40 हजार क्युसेकने वाहत होते. मात्र, वीर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला. तर, उजनी धरण परिक्षेत्रात पाऊस कमी झाल्याने होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. 1 लाख 26 हजार 600 क्युसेकचा उजनीचा विसर्ग आता सध्या 51 हजार 600 क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठची गावे आणि पंढरपूर शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
उजनी व वीर धरण शंभर टक्के भरले असल्याने जर या भागात पाऊस झाला, तर विसर्ग सोडावा लागत आहे. त्यामुळे उजनी व वीर धरण परिसरात पावसाची काय स्थिती राहते, यावर बरेचसे अवलंबून असणार आहे. दरम्यान, गेले दोन दिवस वीर धरणातून नीरा नदीत करण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मात्र, आज दुपारी वीर धरणातून नीरा नदीत 5987 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर उजनीतून 51 हजार 600 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. सध्या पंढरपूर येथे एक लाख क्युसेकच्या विसर्गाने नदी वाहत आहे. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. असे असले तरी बुधवारी सुमारे 40 हजार क्युसेकचा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. यामुळे पंढरपूर येथील व्यासनारायण व अंबाबाई पटांगण झोपडपट्टीतील घरांमध्ये शिरलेले पाणी दहा फुटाने कमी होऊन नदीपात्रात माघारी ओसरले आहे. तरीदेखील येथील नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील 70 कुटुंबांना स्थलांतरित निवारा शेडमध्येच राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
पूर ओसरू लागला असला तरी नदीत 1 लाखाचा विसर्ग वाहत आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील 6 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व 5 पूल बुडालेलेच आहेत. त्यामुळे यावरून होणारी वाहतूक सलग तिसऱया दिवशीही बंद आहे. पुराचे पाणी नदीकाठच्या शेतातील पिकांमध्ये शिरले आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे.
जुना अकलूज रोड व गोपाळपूर पूल झाला सुरू
पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला होता. तसेच पंढरपूर ते जुना अकलूज रोडवरील शिरढोण येथे रस्त्यावर दहा फूट इतके पाणी आले होते. त्यामुळे येथून होणारी वाहतूकदेखील बंद करण्यात आली होती. मात्र, पूर ओसरू लागल्याने येथून बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.