सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वपरीक्षा घेऊन निकाल जाहीर झाले; परंतु प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नव्हता. त्यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेनेच्या पदाधिकाऱयांनी शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांच्याकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज संबंधित अधिकाऱयांची बैठक झाली. त्या बैठकीत मंत्र्यांच्या आदेशानंतर सीईटी सेलने दोन दिवसांत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले. याबाबत अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले होते.
मंत्रालयातील उच्च शिक्षणमंत्र्यांच्या दालनात ही बैठक झाली. खासगी आणि डीम्ड विद्यापीठात विद्यार्थ्यानी प्रवेश घ्यावे यासाठी उशीर करीत आहेत का, असा प्रश्न यावेळी आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. विविध मुद्दय़ांवर सविस्तर चर्चेनंतर मंत्र्यांनी पुढील आदेश दिले. या बैठकीला प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई, मुंबई विद्यापीठ प्र-कुलगुरू डॉ.अजय भामरे, युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशांक झोरे, अॅड. धरम मिश्रा उपस्थित होते.
- शुल्क नियामक प्राधिकरण (एफआरए) सचिव यांनी त्यांच्या विभागातील त्रुटी दूर कराव्यात. तसेच महाविद्यालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक महाविद्यालयांना शुल्कवाढीची परवानगी देण्यात यावी.
- मुंबई विद्यापीठ कुलगुरू निधीमधून चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भरीव मदत करावी.
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह उद्घाटन होऊन दोन वर्षे झाली तरी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देण्यात आलेले नाही. ते तातडीने सुरू करावे.
- कुलसचिव आता होणाऱया मुलाखतीतून 17 ऑगस्ट रोजी भरण्यात यावे.
- प्रवेश नियंत्रण समिती पुन्हा सक्रिय करण्यात यावी.