
दुधाला प्रतिलिटर 40 रुपये दर मिळावा व दूधदराचा राज्यात कायदा करावा, या मागणीसाठी सलग 33 दिवस सुरू असलेले कोतुळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची आज यशस्वी सांगता झाली. राज्याचे दुग्ध उपायुक्त हेमंत गडवे व दुग्धविकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी कोतुळ येथे येऊन आंदोलकांची भेट घेत मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
शेतकऱयांना दुधाला किमान दर देणे बंधनकारक करणारा, वजन काटे व मिल्कोमीटर यांच्यामार्फत शेतकऱयांची होणारी लुटमार रोखणारा कायदा आंध्र प्रदेश सरकारने तयार केला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा तयार करावा, अशी आग्रही मागणी आंदोलनात लावून धरण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने याबाबत कायद्याचे प्रारूप तयार केले असून, या कायद्याचा ड्राफ्ट आंदोलकांना सादर करण्यात आला आहे. आंदोलनाची ही मोठी उपलब्धी आहे. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव साबळे, विनोद देशमुख, अभिजीत उर्फ बबलू देशमुख, भाऊसाहेब देशमुख, बाळासाहेब गीते, अभी देशमुख, प्रकाश देशमुख, गौतम रोकडे, भारत गोर्डे आदींनी सहभाग घेतला. आज कोतुळ येथे चर्चेची चौथी फेरी झाली. यावेळी शेतकऱयांच्या अनेक मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत.
सरकारच्या वतीने दुधाला पाच रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. खासगी व सहकारी दूध संघाने 30 रुपये दूध उत्पादकांना द्यावे, असे बंधन या योजनेत टाकण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येत असलेल्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. 3.2/8.3 गुणवत्तेच्या आतील दुधाला 1 रुपयाचा डिडक्शन रेट अनेक कंपन्यांनी लागू केला आहे. तो कमी करून 30 पैसे करावा, यासाठीचा आग्रह पुन्हा एकदा आंदोलकांनी लावून धरला. हा रेट कमी करण्याबाबत अधिकाऱयांनी आंदोलकांना शब्द दिला आहे.
कोतुळ दूध आंदोलन सलग 33 दिवस चालले. राज्यात आजवर झालेल्या आंदोलनांमध्ये हे सर्वात प्रदीर्घकाळ चाललेले आंदोलन होते. आंदोलनाची यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी कॉ. सदाशिव साबळे यांनी मेहनत घेतली. यावेळी अमृतसागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड, रावसाहेब वाकचौरे, आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, दादाभाऊ सावंत, संदीप चौधरी, संजय साबळे, प्रकाश साबळे, ज्ञानेश्वर काकड, राजू गंभीरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.