ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगल्यानंतर महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने निराश मनाने निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आणखी एक धक्का बसला आहे.
“आई, कुस्ती जिंकली. मी हरले. मला माफ कर. तुझे स्वप्न, माझे धैर्य सगळेच तुटले असून आता माझ्यात याहून अधिक ताकद राहिलेली नाही. कुस्तीला रामराम. (2001-2024) मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन. क्षमस्व”, अशी पोस्ट 29 वर्षीय विनेश फोगाट हिने गुरुवारी पहाटेच्या सुमारास केली.
पदकाच्या आशा कायम, सीएएस देणार निकाल
दरम्यान, विनेश फोगाट हिच्या ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या आशा अद्यापही कायम आहेत. फायनलसाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट हिने सीएएस (कोर्ट ऑफ अर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) कडे दाद मागितली आहे. आपल्याला संयुक्तपणे रौप्यपदक मिळावे किंवा अंतिम सामना खेळू द्यावा अशी मागणी तिने केली होती. तिची अंतिम सामना खेळू देण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली, मात्र संयुक्तपणे रौप्यपदक देण्याच्या मागणीवर सुनावणी होणार असून सीएएस गुरुवारी 11.30 च्या सुमारास निकाल देईल. जर सीएएसने विनेशच्या बाजूने निकाल दिला, तर आयओसीला तिला संयुक्तपणे रौप्यपदक द्यावे लागेल.
100 ग्रॅम वजनाने घात केला
उपांत्य फेरीतील धडाकेबाज विजयानंतर झुंजार कुस्तीपटू विनेश फोगाटचे सुवर्णपदक पक्के झाले होते. तिच्या विजयाचा जल्लोष मंगळवारी रात्री अवघ्या हिंदुस्थानात सणासारखा साजरा केला गेला. मात्र बुधवारी सकाळी सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी घात झाला. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचे वजन 100 ग्रॅम अधिक झाल्यामुळे ती अपात्र ठरली आणि तिचे आणि अवघ्या देशाचे पदकाचे स्वप्न एका क्षणात मातीमोल झाले. तिची सुवर्णपदकाची लढत अमेरिकेच्या साराह हिल्डब्रांटशी होणार होती. विनेश अपात्र ठरल्यामुळे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या क्युबाच्या लोपेझला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.
मंगळवारी रात्री विनेश फोगाटचं वजन तब्बल 2 किलो जास्त होतं असे वृत्त आहे. तिनं ते वजन कमी करण्यासाठी खूप मेहनतही घेतली. विनेश रात्रभर झोपली नाही. जेवलीही नाही.
वजन कमी करण्यासाठी तिनं सायकलिंग केली, स्किपिंग केली. एवढंच नव्हे तर तिने आपलं रक्तही काढलं, केस अन् नखंही कापले. याचबरोबर सॉना रूममध्येही (पाण्याच्या वाफेची रूम) ती प्रदीर्घ काळ बसली, मात्र एवढं सारं करूनही विनेशचं शंभर ग्रॅम वजन जास्तच भरलं. त्यामुळे तिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले.
विनेशविरोधात सरकारचं षडयंत्र, कुस्ती महासंघाचाही हात; कुटुंबियांचा गंभीर आरोप