पालिका रुग्णालयांत केसपेपर काढण्यापासून उपचारांपर्यंत रांगांमध्ये होणारी रखडपट्टी टाळण्यासाठी आता ‘टोकन पद्धत’ सुरू केली जाणार आहे. यामध्ये सकाळी टोकन घेतल्यानंतर रुग्णांना दिलेल्या वेळेत उपस्थित राहून उपचार घेता येणार आहे. त्यामुळे रांगेमध्ये तासन्तास होणारी रखडपट्टी थांबणार आहे. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शेकडो रुग्णांना यामुळे फायदा होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत आणि अद्ययावत सुविधांमुळे केवळ मुंबईच नव्हे राज्य-देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण दररोज उपचारासाठी येत असतात. यामध्ये केईएम, शीव, नायर आणि कूपर या मोठय़ा रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी असते. उपलब्ध क्षमतेपेक्षा अनेक पटींनी जादा रुग्ण उपचारासाठी रांगा लावतात. यामध्ये तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने मुंबईबाहेर आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होतात. या पार्श्वभूमीवर रांगांमधील रखडपट्टी टाळण्यासाठी ‘टोकन पद्धत’ वापरण्याबाबत कार्यवाही करा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आज आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले. रुग्णालयांमधील स्वच्छता, रुग्णसेवा, औषध पुरवठा, प्रसाधनगृहे आदी सुविधा नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे पुरवण्याचे निर्देशही बांगर यांनी दिले.
रुग्ण–नातेवाईकांशी सौजन्याने वागा!
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि रुग्णांसोबत येणारे नातेवाईकांसोबत अरेरावीची भाषा न वापरता सौजन्याने वागा, असे निर्देशही बांगर यांनी दिले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धतता, रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेची व विद्युत उपकरणांची नियमित तपासणी, अग्निसुरक्षेच्या दृष्टीने नियमित फायर ऑडिट, प्राणवायू संचांची आणि रुग्णालयातील सर्व उपकरणांची नियमित तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.