दररोज एक हजार सैनिकांचा मृत्यू
पुतीन यांना युद्धात यश मिळत असले तरी त्याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. रशियाचे सैनिक मोठय़ा संख्येने मृत्युमुखी पडले आहेत. जून आणि जुलै महिन्यात 70 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक दिवशी कमीत कमी एक हजार सैनिक युद्धात मारले जात आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात हा पहिला आकडा वाढू शकतो.
याह्या सिनवार हमासचा प्रमुख
कॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने गाझामधील आपला प्रमुख कमांडर याह्या सिनवार याची नवीन नेता म्हणून निवड केली आहे. हमासने मंगळवारी एक निवेदन जारी केले की, सिनवार नवीन प्रमुख म्हणून इस्माईल हनियेहची जागा घेईल. याह्या सिनवारची हमासवर मजबूत पकड आहे. हानियेहच्या नेतृत्वाखाली हमासने गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 75 वर्षांतील सर्वात मोठा हल्ला केला होता. यामध्ये 1200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर सिनवार हा त्याचा सूत्रधार होता. नवीन हमास प्रमुखाचे पूर्ण नाव याह्या इब्राहिम हसन सिनवार आहे. त्याचा जन्म गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस निर्वासित छावणीत झाला.
ब्रिटन हिंसाचारात वाढ; सहा हजार पोलीस तैनात
ब्रिटनमध्ये तीन मुलींच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये या हत्येचे पडसाद उमटले आहेत. ब्रिटनमधील हिंसाचार रोखण्यासाठी ब्रिटिश सरकारने वेगवेगळय़ा ठिकाणी 6 हजार पोलीस अधिकारी तैनात केले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेऊन हिंसाचार रोखण्याचे आदेश दिले. ब्रिटनमध्ये हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 378 लोकांना अटक करण्यात आली असून काहींचा शोध घेतला जात आहे. दक्षिण इंग्लंडच्या प्लायमाऊथमध्ये दंगेखोरांनी केलेल्या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले. आयर्लंडच्या बेलफास्टमध्ये एका विदेशी नागरिकाच्या दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केला. यात एक जण गंभीर जखमी झाला.
रीलच्या नादात तरुण 150 फूट दरीत कोसळला
सेल्फी काढणे आणि रील बनवणे एका तरुणाला चांगलेच भोवले. पाय घसरल्याने हा तरुण धबधब्यावरून 150 फूट खाली पडल्याची घटना राजस्थानच्या भिलवाडा येथे घडली. कन्हैया लाल बैरवा असे या तरुणाचे नाव असून तो 17 वर्षांचा होता. मित्रासोबत तो मेनाल येथे पिकनिकसाठी पोहोचला होता. सेल्फी घेण्यासाठी आणि रील काढण्याचा कन्हैया लाल प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला. या वेळी त्याने सेफ्टी चेन पकडली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर तो 100 मीटर वाहून गेल्यानंतर धबधब्याच्या 150 फूट खाली पडला.
बंगळुरूमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत बार सुरू
बंगळुरूमध्ये आता रात्री 1 वाजेपर्यंत रेस्टॉरेंट, बार, हॉटेल आणि क्लब सुरू ठेवले जाणार आहेत. कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला आहे. बंगळुरू महापालिकाअंतर्गत येणारे शहरातील सर्व बार, क्लब आणि हॉटेल्स रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवले जाणार आहेत. कर्नाटक सरकारने नाईटलाईफचा वेळ वाढवण्यास मंजुरी दिली. शहरात आता सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत बार उघडे राहतील. याआधी केवळ हॉटेल, बार आणि क्लब रात्री 11 वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी होती.
फिलिस्तीनसाठी घोषणा; महिलेला 60 हजारांचा दंड
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता वेगवेगळ्या देशांत उमटू लागले आहेत. बर्लिनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात एका महिलेने फिलिस्तीनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावरून या महिलेला कोर्टाने 600 युरो म्हणजेच जवळपास 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एवा एम असे या 22 वर्षीय महिलेचे नाव आहे. एवाच्या वकिलांनी न्यायालयाच्या या निर्णयाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनसाठी ‘ब्लॅक डे’ म्हटले आहे.
पाकिस्तानी नागरिकाला अमेरिकेत अटक
अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक करण्यात आली. आसीफ मर्चंटने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सर्वोच्च कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकन नेत्यांच्या हत्येचा कट रचला होता. न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये हा अयशस्वी कट कोणाच्या हत्येचा रचला गेला याचा उल्लेख नाही, परंतु अमेरिकन अधिकारी याचा संबंध ट्रम्प यांच्याशी जोडत आहेत. अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांची सुरक्षा वाढवली आहे.