दोन दिवसांपासून शेअर बाजाराने गटांगळ्या खाल्ल्यानंतर बुधवारी मात्र शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 874 अंकांनी वधारून 79,468 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 304 अंकांची झेप घेत 24,279 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराने झेप घेतल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सेन्सेक्स 972 अंकांच्या झेपेसह उघडला. तर निफ्टी 297 अंकांच्या वाढीसह 24,289 अंकांवर उघडला. बुधवारी आयटी शेअर्समध्ये सर्वात जास्त वाढ पाहायला मिळाली. अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये 3.42 टक्के, पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये 3.20 टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्समध्ये 2.61 टक्के, टाटा स्टीलचे शेअर्स 2.40 टक्के, इन्पहसिसचे शेअर्स 2.22 टक्क्यांनी, मारुतीचे शेअर्स 2.09 टक्क्याच्या वाढीसोबत बंद झाले.
या शेअर्समध्ये घसरण
इंड्सइंड बँकेचे शेअर्स 2.33 टक्क्यांनी घसरले. हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, टायटन आणि भारती एअरटेल या पाच कंपन्यांचे शेअर्स घसरणीसोबत बंद झाले. 4031 शेअर्सपैकी 2988 शेअर्स वाढीसोबत बंद झाले. 945 शेअर्समध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांनी 9.18 लाख कोटी कमावले
बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन बुधवारी 448.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मंगळवारी हे मार्केट कॅपिटलायझेशन 439.59 लाख कोटी रुपये होते. यामुळे बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज जवळपास 9.18 लाख कोटींनी वाढले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 9.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.