>> विनिता शाह
कोसळणाऱ्या पावसामुळे गावाखेडय़ातील एखाद्या गरीबाच्या घराचे छत कोसळणे किंवा एखादी जुनी इमारत कोसळणे या घटना समजण्यायोग्य असतात. पण भारतात गेल्या काही वर्षांत प्रचंड पैसा खर्च करून उभारलेली आणि व्यवस्थापनासाठी प्रचंड शुल्कआकारणी केली जाणारी विमानतळे जेव्हा छत कोसळण्याच्या घटनेमुळे चर्चेत येतात तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. याचा स्पष्ट अर्थ विमानतळांच्या उभारणीसह देखभालीमध्ये हलगर्जीपणा होत आहे.
मुसळधार पावसामुळे पायाभुत सुविधांची हानी होते. पूल वाहूनजाणे, बंधारे फुटणे, रस्त्याला भेगा पडणे यासारख्या घटना घडत असतात. मात्र आता अतिउच्च दर्जाच्या असणाऱ्या विमानतळांनादेखील पावसाचा म्हणजेच नैसर्गिक संकटाचा फटका बसत आहे. मुसळधार पावसामुळे गेल्या महिन्यात नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील टर्मिनल एकवरचे छत आणि एक मोठा खांब कोसळला आणि भारतीय विमान प्राधिकरणाला मोठा धक्क्का बसला. त्या दिवशी जबलपूरच्या डुमना विमानतळाच्या छतावरचे तात्पुरते आच्छादनही पडले आणि एका मोटारीचे नुकसान झाले. आणखी एक घटना घडली. राजकोट विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरचे छत पडले. एकुणातच विमानतळाचे छत कोसळण्याच्या घटनांमुळे त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित राहू लागले. या पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक बातमी आली. भारतीय विमान क्षेत्र हे ब्राझील आणि इंडोनेशियाला मागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे देशांतर्गत विमान क्षेत्र बनल्याचे सांगण्यात आले.
केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षांच्या आत सुमारे 200 विमानतळांची उभारणी आणि नूतनीकरण करण्याचा धडाका लावला. यासाठी 11 अब्ज डॉलरची तरतूद केली. मात्र विमानतळाची दुरुस्ती आणि नव्याने केली जाणारी उभारणी कितपत सक्षम आहे हेदेखील तपासले पाहिजे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनलचा नुकताच विस्तार करण्यात आला होता. या विस्तारामुळे त्याची क्षमता वाढली आहे. वार्षिक 40 दशलक्ष प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. पण विस्तारीकरण केले जात असताना आणि प्रवाशांना सुविधा देत असताना त्याचा दर्जा राखला जातो की नाही, हेदेखील पाहिले पाहिजे. आगामी काळात संभाव्य चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा सामना करण्याची क्षमता विमानतळाच्या रचनेत असणे अपेक्षित असताना दुसरीकडे या इमारतींची हानी होत आहे. यातही गमतीची बाब म्हणजे ‘स्कायट्रक्स’च्या 2024च्या अहवालात दिल्लीला भारत किंवा दक्षिण आशियातील 2024चे सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरविण्यात आले. स्कायट्रक्स ही लंडनमधील नामांकित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक रेटिंग संस्था आहे. रेटिंगसाठी प्रवाशांकडून कौल मागितला जातो. त्यांचा विमानतळावरचा अनुभव लक्षात घेता रेटिंग दिले जाते. एकीकडे प्रवाशांनी दिल्ली विमानतळाला पसंती दिलेली असताना छत कोसळण्याच्या घटनेने टीकाकारांना अहवालाच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडले.
भारतात विमानतळाचे छत कोसळणे ही नवीन बाब नाही. गुवाहाटी विमानतळ आणि पोर्टब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरदेखील अशा घटना घडल्या. दिल्लीच्या घटनेनंतर राजकीय पक्षांकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असताना माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली विमातळाची बांधणी आणि विस्तार ही जगातील नामांकित कंपनीकडून केल्याचे स्पष्टीकरण दिले. मग पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच छत का कोसळले?
फॉरेन्सिक ऑडिट आवश्यक
दिल्ली विमानतळाच्या घटनेसंदर्भात दोषपूर्ण बांधकामाचे कारण सांगितले जात आहे. यातील सत्य बाहेर काढण्यासाठी एका स्वतंत्र संस्थेकडून विमानतळाच्या बांधकामाचे फॉरेन्सिक ऑडिट करायला हवे. तसेच इंजिनीयरिंग क्षेत्रालाही वकील, डॉक्टरप्रमाणेच नियामक संस्थेकडून नोंदणी करणे बंधनकारक करायला हवे.
अन्य देशांतही घटना
विमानतळ दुर्घटनांच्या बाबतीत भारत एकमेव देश नाही. 26 जानेवारी 2022मध्ये एका हिमवृष्टीत इस्तंबूल विमानतळावरील कार्गो गोदामाचे छत ढासळले होते. परिणामी अनेक उड्डाणे रद्द केल्यामुळे हजारो नागरिक अडकून पडले. या प्रकरणात सदोष बांधकाम करणाऱयांना दोषी ठरविले गेले. पॅरिस येथे चार्लस द गॉल विमानतळाच्या ‘टर्मिनल-2 ई’चे 23 मार्च 2004मध्ये छत कोसळले. यात चौघांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. एका वर्षानंतर जाहीर केलेल्या अहवालात उणिवांचा संदर्भ देण्यात आला.
अनेक उणिवा
बांधकामाचा दर्जा किंवा पुरेशी देखभाल नसणे याशिवाय विमानतळाच्या रचनेत आणखी उणिवा राहू शकतात. काही वर्षांपूर्वी डिझाईन इंजिनीयर आणि कमर्शियल वैमानिक आर्मंड ब्रजोस्को यांनी विमानतळांच्या रचनेवर महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले. त्यांच्या मते, विमानतळ वैशिष्टय़पूर्ण राहावे यासाठी रचनाकारांच्या कौशल्याची कसोटी लागते. परिणामी टर्मिनलचा आकार पूर्ण केल्यानंतर रचनाकार (आर्किटेक्ट) आपले काम थांबवतो आणि पुढील काम एरोड्रोम डिझायनरकडे सोपवितो. त्यात फरशी, पायऱ्या, स्लॅब आदींचा समावेश असतो आणि अशा किचकट कामांची माहिती रचनकाराला असतेच असे नाही. त्यांनी आपल्या अहवालात विमानतळाच्या विविध भागातील दोषांचे चित्रण मांडले. जवळपास सर्वच टर्मिनलच्या फ्लोअरची उंची ही प्रवाशांना विविध मजल्यांवर पोचण्यासाठी सुलभता उपलब्ध करून देते. परिणामी प्रस्थानाच्या ठिकाणी गरजेपेक्षा अधिक उंच छत असणारे टर्मिनल तयार केले जाते. त्याच वेळी आगमन हॉल हा त्याच्या अगदी विरुद्ध असतो. विमानतळाचे अस्तित्व शंभर वर्षांपर्यंत असते आणि त्यामुळे आर्किटेक्ट, इंजिनीयरला त्याची उभारणी करताना दुरगामी विचार करावा लागतो आणि त्यानुसार आरखडय़ाला मूर्त रूप देण्याची आवश्यकता असते.
विमानतळाच्या बांधकामाविषयीचे तज्ञ कर्टिस डब्लू फेन्ट्रेस यांनी एका संकेतस्थळावर म्हटल्याप्रमाणे, भविष्यातील बहुतांश टर्मिनल बहुस्तरीय हायपरस्पेस असणारे राहतील आणि ते ठिकाण संस्मरणीय राहील यादृष्टीने त्याची रचना केलेली असेल. फेन्ट्रेस यांनी अनेक विमानतळांचा आराखडा तयार केला असून त्यात डेनव्हेर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जेपसेन टर्मिनलचा समावेश करता येईल. यात जगातील सर्वात मोठे आणि वैशिष्टय़पूर्ण छत आहे. यामध्ये आगविरोधी, चक्रीवादळाचा तडाखा सहन करण्याची क्षमता आहे. या छताच्या साहित्यात फायबर ग्लास, टेफलॉनचा वापर केला आहे. अशा साहित्यांपासून तयार केलेल्या छताची देखभाल फारशी करावी लागत नाही. त्याच वेळी पारंपरिक छत हे दर दहा ते पंधरा वर्षांत बदलावे लागते. ‘फायबर ग्लासच्या छताचे आयुष्य 30 वर्षांपेक्षा अधिक असते. कदाचित भारतात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे होणाऱ्या विमानतळावरील दुर्घटना कमी करण्यासाठी डेनेव्हरसारख्या विमानतळाचे तंत्र अंगीकारणे गरजेचे आहे.