शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी भाजप कार्यकर्ता विजय सदाशिव औटी याला मंगळवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. मात्र यावेळी महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू असताना त्याला मागच्या दाराने पळवून नेण्यात आले. या सर्व प्रकरणाबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी “उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, दृष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा” हे भक्तीगीत गात प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले. याची शहरासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
ज्या प्रकारे ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमधून पळवून लावण्याचा आले होते. तसाच प्रकार विजय औटी याला पळवून लावण्याचा होता. असा आरोप महाविकास आघाडीने मंगळवारी केला होता. मंगळवारी रात्री आघाडीचे ठिय्या आंदोलन सुरू असताना मागच्या दाराने पोलिसांनी आरोपीला पळवून नेत रात्री उशिरा पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे दाखल करून न घेतल्यामुळे रात्री पारनेर सबजेलमध्ये आरोपीला नेण्यात आले होते. तसे फोटो आणि कागदपत्रे पुढे आली आहेत. काँग्रेसचे किरण काळे म्हणाले, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामध्ये राज्य सरकार आरोपीला सत्तेचा गैरवापर करून मदत करत आहे. राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर म्हणाले, आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट कशी दिली जाते ? यामध्ये राजकीय दबाव आहे. शिवसेनेचे विक्रम राठोड म्हणाले, जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. हे वेळीच रोखले पाहिजे. राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलीस व सिव्हील प्रशासनाने यात कुणाचीही गय करू नये.
सीसीटीव्ही फुटेज देण्याचे लेखी आश्वासन
किरण काळे, प्रकाश पोटे यांनी सिव्हील मधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी लेखी अर्जद्वारे केली होती. याबाबत स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहीचे आश्वासनाचे पत्र देण्यात आले आहे. सदर फुटेज डाऊनलोड करण्यासाठी तांत्रिक कारणास्तव 15 ते 20 तासांचा अवधी आवश्यक असल्याने ती कार्यवाही पूर्ण होताच फुटेज उपलब्ध करण्यात करून देण्यात येईल असे म्हटले आहे. लेखी आश्वासन नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
सिव्हिल सर्जन यांनी म्हटले आहे की, दि. 3 ऑगस्ट रोजी आपल्या कारागृहातील बंदी विजय सदाशिव औटी हा पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्याला दि. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8.50 वा. डिस्चार्ज देण्यात आला. सकाळी 11.45, दुपारी 12.05 वा. पाठपुरावा करण्यात आला. पुन्हा 1.05 वा. सदर बंदिस ड्युटीवरील पोलीस कर्मचारी सचिन आनंदा जावळे, बॅच नंबर 1509 यास हस्तांतरित करण्यात आले होते. परंतु रात्री 08.15 पर्यंत बंदिस पारनेर कारागृह येथे स्थलांतरित करण्यात आले नाही. ही बाब गंभीर असून याबाबत आपण पुढील कार्यवाही करावी असे सिव्हिल सर्जन यांनी पत्रात म्हटले असून या पत्राची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील पाठविण्यात आली आहे.